डॉक्टरकडून रुग्णाला अमानुष मारहाण

    दिनांक :04-Jun-2019
जयपूर: रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला डॉक्टरने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील जयपूरच्या प्रसिद्ध सवाई मानसिंह मेडिकल कॉलेजमध्ये समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सवाई मानसिंह मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाला डॉक्टर बेडवर चढून बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने रुग्णालय प्रशासनाला २५ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमधील चांदपोल बाजार परिसरातील ३० वर्षीय रहिवासी मुबारिक याला १ जूनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुबारिक विषारी औषध प्यायला होता. तसेच तो पोटाच्या विकाराने आजारी असल्याने त्याच्यावर रुग्णालयातील डॉक्टर काही दिवसांपासून उपचार करत होते. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या काही वैद्यकीय तपासण्यांसाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी महिला डॉक्टर गेल्या असता रुग्ण हिंसक झाला. त्याने डॉक्टरला मारहाणही केली. तिथे उपस्थित अन्य एक पुरुष डॉक्टर आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही रुग्णाने मारहाण केल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.