श्रीलंकेतील सर्व नऊ मुस्लिम मंत्र्यांचे राजीनामे

    दिनांक :04-Jun-2019
कोलंबो: एप्रिलमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनांनंतर तेथील बौद्ध समुदाय मुस्लिमांवर अत्यंत संतप्त झाला आहे. तेथील सरकारमध्येही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. मुस्लिम राज्यपाल आणि मुस्लिम मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी बौद्ध भिक्खू खासदाराच्या आमरण उपोषणानंतर श्रीलंकेतील दोन मुस्लिम राज्यपालांनी सोमवारी राजीनामे दिले होते. त्या पाठोपाठ श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील सर्व नऊ मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.
 

 
 
श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू अथुरालिए रथाना हे कँडी येथे राजीनाम्यासाठी आमरण उपोषणाला बसले होते. बौद्ध भिक्खू अथुरालिए रथाना हे पंतप्रधान रानिल विक्रमािंसघ यांच्या पक्षाचे खासदारही आहेत. ईस्टर संडेच्या बॉम्ब स्फोटांनंतर त्यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
बॉम्बस्फोट घडवणार्‍या गुन्हेगारांसोबत मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांचे संबंध असल्याचा आरोप बौद्ध भिक्खू अथुरालिए रथाना यांनी केला आहे. संबंधित मंत्र्यांची चौकशी केली जावी, अशी त्यांची मागणी होती. या मागणीच्या समर्थनार्थ श्रीलंकेतील नागरिक आणि संघटनाही रस्त्यावर उतरल्या होत्या.
राजीनामा देणार्‍या मंत्र्यांमध्ये आरोप असलेले कॅबिनेट मंत्री कबीर हाशिम, हलीम आणि रिशद बतीउद्दीन यांचाही समावेश आहे. त्यांच्यासोबतच राज्यमंत्री फैजल कासिम, हारेश, अमीर अली, सय्यद अली, झहीर मौलाना यांच्यासह उपमंत्री अब्दुल्ला महरूफ यांनीही पद सोडले आहे.
या राजीनाम्यांच्या आधी सोमवारी पूर्व प्रांताचे राज्यपाल एम. ए. हिजबुल्ला आणि पश्चिम प्रांताचे राज्यपाल अजहत सॅल्ले यांनी आपले राजीनामे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांच्याकडे सुपुर्द केले होते.