केरळमध्ये ‘हाय अलर्ट’, निपाह व्हायरस बाधित रुग्ण आढळला

    दिनांक :04-Jun-2019
केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. केरळमध्ये निपाह विषाणूची बाधा झालेला रुग्ण आढळला असून सुमारे ८६ जणांना आरोग्य विभागाने देखरेखीखाली ठेवले आहे. या सर्व रुग्णांना निपाह विषाणूची बाधा झाल्याचा संशय असून वैद्यकीय अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
 
 
केरळमधील एर्नाकुलम येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला निपाह विषाणूची बाधा झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री के के शैलेजा यांनी कोच्चीतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निपाह विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना राबवल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चार जणांनाही ताप आला असून त्यांना देखील देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात दोन परिचारिकांचा समावेश आहे. या चौघांची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगितले जाते. मात्र, चौघांपैकी एका रुग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे. निपाह बाधित रुग्णाची प्रकृती गंभीर नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. नागरिकांबरोबरच रुग्णालयातील डॉक्टर आणि सिस्टर यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निपाह विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी माध्यमांनीही पुढाकार घ्यावा तसेच सोशल मीडियावरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही विभागाने म्हटले आहे.
ही आहेत ‘निपाह’ची लक्षणे
‘निपाह’ विषाणू आजारात विशेषत: ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात.