काश्मीरात सुरक्षा रक्षकांची नवी हिटलिस्ट

    दिनांक :04-Jun-2019
काश्मीरप्रश्न आणि दहशतवादाची समस्या यावर जशाच तशे उत्तर देण्याची मोदी सरकारची भुमिका राहिली आहे. त्यातच आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात आले आहे. यामध्ये १० सर्वाधिक खतरनाक दहशतवाद्यांची हिटलिस्ट तयार करण्यात आली आहे. यामध्ये रियाज नायकू, ओसामा आणि अश्रफ मौलवी यांच्यासारख्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. हे दहाही दहशतवादी आता सुरक्षा रक्षकांच्या निशाण्यावर असणार आहेत.

 
काश्मीरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या दहशतवाद्यांच्या यादीत हिज्बुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा आणि अल बदर या दहशतवादी संघटनांचे सदस्य असलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश आहे. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.
 
 
सुरक्षा रक्षकांनी बनवलेली दहशतवाद्यांची हिटलिस्ट
१) रियाज नायकू ऊर्फ मोहम्मद बिन कासीम : हा A ++ श्रेणीतला दहशतवादी असून तो बांदीपोराचा रहिवासी आहे. २०१० पासून तो काश्मीरमधील दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहे.
२) वसीम अहमद ऊर्फ ओसामा : लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हा सदस्य असून शोपियां जिल्ह्याचा कमांडर आहे.
३) मोहम्मद अश्रफ खान ऊर्फ अश्रफ मौलवी : हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हा सदस्य असून अनंतनाग जिल्ह्यात तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय आहे.
४) मेहराजुद्दीन : हा देखील हिज्बुलचा सदस्य असून बारामुल्ला जिल्ह्यात तो हिज्बुलचा डिस्ट्रिक्ट कमांडर म्हणून कार्यरत आहे.
५) डॉ. सैफुल्ला ऊर्फ सैफुल्ला मीर ऊर्फ डॉ. सैफ : हा देखील सुरक्षा रक्षकांच्या हिटलिस्टवर असून मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. श्रीनगरमध्ये हिज्बुलचे केडर वाढवण्यासाठी याचा प्रयत्न सुरु आहे.
६) अरशद उल हक : हिज्बुल मुजाहिद्दीनचा सदस्य असलेला हा दहशतवादी पुलवामा जिल्ह्याचा कमांडर आहे.
७) हाफिज उमर : पाकिस्तानचा रहिवासी असलेला हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळावरुन प्रशिक्षण घेऊन तो भारतात आला होता. सध्या तो जैशचा चीफ ऑपरेशनल कमांडर आहे.
८) जाहिद शेख ऊर्फ उमर अफगाणी : जैशचा हा दहशतवादी अफगाणिस्तानातील नाटो सैन्यासोबत लढाईल खेळला आहे. याने तालिबानी दहशतवाद्यांसोबत प्रशिक्षण घेत काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. सुरक्षा रक्षक याचा कसून शोध घेत आहेत.
९) जावेद मट्टू ऊर्फ फैजल ऊर्फ साकीब ऊर्फ मुसैब : अल बदल या दहशतवादी संघटनेच्या या दहशतवाद्याला सुरक्षा रक्षकांनी आपल्या हिटलिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. हा दहशतवादी उत्तर काश्मीरात अल बदरचा डिव्हिजनल कमांडर आहे.
१०) ऐजाज अहमद मलिक : हा हिज्बुलचा सदस्य असून त्याला नुकतेच कुपवाडात हिज्बुलचा डिस्ट्रिक्ट कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.