पाकिस्तानची अवस्था झिंगलेल्या माकडांसारखी: उद्धव ठाकरे

    दिनांक :04-Jun-2019
पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली आहे अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पाकिस्तानावर ताशेरे ओढण्यात आले असून पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या इफ्तार पार्टीतील राजकीय नाट्याला लक्ष्य करण्यात आलं आहे.
इस्लामाबादेत हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत पाकिस्तान सरकारने भरपूर गोंधळ घातला. अनेक अधिकाऱ्यांना परत पाठवण्यात आले. अनेकांना दारात अडवण्यात आले. अनेकांना धमकावण्यात आले. या घटनेवर सामनातून परखड टीका करण्यात आली आहे. पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली आहे अशा शब्दात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. मोदी सरकारने मुजोर पाकडय़ांची नांगी ठेचली आहे, तरी शेपूट अजूनही वळवळत आहे, अशा शब्दात पाकिस्तानवर शरसंधान साधण्यात आले आहे. तसंच विकास आणि दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या बाबतीत मात्र पाक सरकार उदासीन आहे असं मतही या अग्रलेखात व्यक्त करण्यात आलं आहे.

शनिवारी इस्लामाबादमधील इफ्तार पार्टीप्रसंगी जे घडवले गेले ते शांतता प्रक्रियेसाठी टाकलेले पाऊल मानावे का?, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले. पाकिस्तान चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही. इस्लामाबादमधील इफ्तार पार्टीत ‘जानेमाने’ लोक होते. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत, कलावंत व प्रशासकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता. या सर्व निमंत्रितांना हॉटेलात शिरण्यापासून रोखले गेले. इतकेच नाही, तर अत्यंत अपमानास्पद पद्धतीने त्यांची झडती घेण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाने कार्यक्रमस्थळी घेराव घातला. या इफ्तार पार्टीस मसूद अजहरछाप लोकांना बोलावले नाही याचा संताप बहुधा पाकला आला असावा.
दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर भारत सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत काश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघड्या घातल्या होत्या. भारताच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त दिल्लीत बोलावून शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, असे मतही शिवसेनेने व्यक्त केले.