आम्ही सुद्धा स्वबळावर लढू, अखिलेश यांचे मायावतींना प्रत्युत्तर

    दिनांक :04-Jun-2019
बहुजन समाज पार्टीबरोबर आघाडी तुटली असेल तर मी त्याचे सखोल चिंतन करेन असे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. पोटनिवडणुकीत आघाडी झाली नाही तर समाजवादी पार्टी निवडणुकीची तयारी करेल. समाजवादी पार्टी सुद्धा स्वबळावर ११ जागांवर पोटनिवडणूक लढेल असे अखिलेश यादव यांनी जाहीर केले. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मंगळवारी सपासोबत पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 
काय म्हणाल्या मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. राजकीय निकड जी आहे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेशच्या निकालाकडे पाहिले तर समाजवादी पार्टीचा मुख्य मतदार असलेल्या यादव समाजाने पक्षाला साथ दिलेली नाही. सपाच्या बलाढय उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला असे मायावतींनी सांगितले.
 
 
आम्ही सपा बरोबर कायमस्वरुपी युती तोडलेली नाही. भविष्यात सपाचे प्रमुख अखिलेश यादव त्यांच्या राजकारणात यशस्वी झाले आहेत असे वाटले तर आम्ही पुन्हा एकत्र येऊ. पण ते यशस्वी झाले नाहीत तर स्वतंत्र लढण्यातच फायदा आहे असे मायावती म्हणाल्या.