विधानसभा निवडणूक राज ठाकरेंसाठी सुवर्णसंधी : प्रकाश आंबेडकर

    दिनांक :04-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम
अकोला,
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंसाठी सुवर्णसंधी असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. राज यांच्यासाठी ही शेवटची संधी असून यापुढे त्यांनी ही संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही, त्यामुळे या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला आहे.
 
 
आंबेडकर म्हणाले, विधानसभेसाठी शिवसेना-भाजपा युती झाली असून त्यांचे जागा वाटपही निश्चित झाले आहे. यामध्ये शिवसेना १३५ जागांवर लढणार आहे. त्यामुळे उर्वरित जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांअभावी निर्माण होणारी पोकळी मनसेला भरुन काढता येईल. मनसे आणि शिवसेनेला मतदान करणाऱ्यांचा मतदार हा एकाच विचारांचा असल्याने ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी असेल. त्यामुळे राज ठाकरे किंगमेकर बनू शकतात, असा दावाही त्यांनी केला आहे.
 
 
दरम्यान, विधानसभेसाठी काँग्रेससोबत आघाडीवर त्यांनी अद्याप आपली भुमिका स्पष्ट केली नाही. मात्र, राजू शेट्टींना सोबत घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात त्यांनी कुणाबरोबर जावे हे लवकरात लवकर स्पष्ट करावे असे आवाहनही आंबेडकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.