झोमॅटो कर्मचार्‍यांना २६ आठवड्यांची पगारी ‘पितृत्व रजा’!

    दिनांक :04-Jun-2019
नवी दिल्ली: महिलांना प्रसूती रजा मिळत असल्याच्या पृष्ठभूमीवर, आता झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीने पुरुषांना 26 आठवड्यांची ‘पितृत्व रजा’ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ही रजा पगारी असणार आहे. बाळाचा सांभाळ करण्यासाठी आईशिवाय कुटुंबातील इतर नातेवाईकांना देण्यात येणार्‍या रजेला ‘दुय्यम देखभाल रजा’, असे म्हटले जाते. बाळाच्या पित्याला देण्यात येणारी रजाही याच श्रेणीत येते.
सरकारी नियमांप्रमाणे, महिलांना बाळंतपणासाठी 26 आठवड्यांची रजा देण्यात आली आहे. त्यानंतर आता या कंपनीने कर्मचारी बाळाचा पिता झाल्यास, आपल्या पुरुष कर्मचार्‍यांना 26 आठवड्यांची रजा देण्याची घोषणा केली आहे. झोमॅटोच्या संस्थापकांनी एका ब्लॉगमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
 
 
 
 
झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र गोएल यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि पुरुषांसाठी नव्या बाळाचे स्वागत करायला दिलेल्या रजेमध्ये असंतुलन आहे. आम्ही स्त्री कर्मचार्‍यांना सरकारी नियमांप्रमाणे 26 आठवडे रजा देतच आहोत. आता, ही सुविधा पुरुष कर्मचार्‍यांनाही देणार आहोत. ही योजना सरोगसी, मूल दत्तक घेणे वा समिंलगी पालकांसाठीही असल्याचे त्यांनी सांगितलं. कंपनीतर्फे पालकांना आर्थिक मदतही केली जाणार आहे.
जन्मानंतर बाळाचा खूप सांभाळ करावा लागतो. त्या दिवसांत बाळासह आईलाही आपुलकी आणि प्रेमाची आवश्यकता असते. पितृत्व रजा मिळाल्यामुळे जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडता येते. गेल्या काही वर्षांमध्ये विभक्त कुटुंबपद्धती दिसून येत आहे. विभक्त कुटुंबपद्धतीत गर्भवती स्त्रीच्या प्रसूतिच्या काळात तिची काळजी घेण्यासाठी कोणी अनुभवी व्यक्ती सोबत नसते. त्यामुळे पतीला मदतीसाठी तिच्याबरोबर राहणे गरजेचे असते. मात्र, त्या पुरुष कर्मचार्‍याला कार्यालयीन कामकाजामुळे रजा घेऊन पत्नीच्या मदतीला घरी राहता येत नाही.