दोन दिवसात २९ लाखांची वीज चोरी उघड

    दिनांक :05-Jun-2019
वीज चोरीविरूध्द महावितरण आक्रमक
अमरावती,
अखंड, दर्जेदार आणि किफायती वीज पुरवठा मिळावा अशी अपेक्षा प्रत्येक ग्राहकाची असताना काही वीज चोरांमुळे महावितरणपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कारवाई करत महावितरणने 20 व 21 मे या सलग दोन दिवशी, संपूर्ण जिल्हाभर एकाच वेळी आकस्मिक व आक्रमक मोहिम राबऊन 29 लाखापेक्षा जास्त रूपयाची वीजचोरी उघड केली आहे. 
 
 
या मोहिमेत संपूर्ण जिल्हयात 2 लाख 56 हजार 16 युनिट म्हणजेच सुमारे 29 लाख 35 हजारापेक्षा जास्त रूपयाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. यामध्ये थेट वीज चोरी करणार्‍यांची संख्या ही 160 असून वीजेचा अनाधिकृत वापर करणारे हे 19 आढळून आले आहे. वीजेच्या अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून थेट वीज चोरी करणार्‍या विरोधात विद्युत कायदा 135 नुसार तर वीजेचा अनाधिकृत वापर करणार्‍या विरोधात कलम 126 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अभिनव पद्धतीने वीजचोरी करणारा सुत्रधार आणि वीजमीटर सोबत छेडछाड करणा-याविरोधात कलम 138 नुसार कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही परिमंडळ कार्यालयांकडून सर्वांना देण्यात आल्या आहे.
 
या मोहिमेत वीजचोरी करताना उघडकीस आलेल्या जिल्हयातील 179 वीज चोरांपैकी अमरावती शहरातील 22 वीजचोरांनी थेट हुक टाकून, मीटरमध्ये फेरुफार करुन, मिटर बायपास करून 61 हजार 920 युनिटची वीज चोरी करत असल्याचे आढळून आले . अनुक्रमे हिच संख्या मोर्शी विभाग 47 वीजचोर 89 हजार 515 युनिट, अमरावती ग्रामीण विभाग 45 वीजचोर 55 हजार 904 युनिट आणि अचलपुर विभाग 46 वीजचोर 48 हजार 667 युनिट आहे. या चोरी झालेल्या वीज युनिटचे पैशामध्ये मुल्यांकन हे 29 लाखापेक्षा जास्त आहे. याव्यतीरिक्त वीजेचा अनाधीकृत वापर करणार्‍यांची संख्या ही जिल्हयात अचलपुर आणि अमरावती शहर विभागात अनुक्रमे 16 व 2 दोन आहे. त्यामुळे त्यांच्यावरही विद्युत कायदा कलम 126 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.