पाच वर्षीय चिमुकलीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यु

    दिनांक :05-Jun-2019
महावितरणचा हलगर्जीपणा भोवला 

 
 
तभा ऑनलाईन टीम  
चांदूर रेल्वे,
रमजान ईदच्या दिवशीच करंट लागुन मुस्कान मो. रफीक या 5 वर्षीय चिमुकलीचा करंट लागुन दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना बुधवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये महावितरणचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
प्राप्तमाहितीनुसार, शिवाजी नगर परिसरात राहणारे मोहम्मद युनुस अल्ला मेहेरबान यांची मुलगी ताहेरा परवीन मो. रफीक हिचा विवाह 7 वर्षांपुर्वी गुजरातमधील जनुन, जि. आनंद येथे झाला होता. परंतु पतीच्या मृत्युमुळे अंदाजे 2 वर्षापासुन ताहेरा ह्या 3 मुलींसह आपल्या माहेरी म्हणजेच स्थानिक शिवाजी नगरात आई वडीलांसह राहत होत्या. मो. युनुस यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे ते मागिल 5-6 महिण्यापुर्वी विद्युत देयक महावितरणाला अदा करू शकले नव्हते. त्यामुळे 5 महिण्यापुर्वी त्यांच्या घरचा विद्युत पुरवठा संबंधित वायरमनने खंडीत केला होता. परंतु सदर वायर थेट खांबावरून न कापता फक्त मिटरमधून कापुन वायर त्याला टेपपट्टी न लावता वर उघड्यावरच ठेवल्याचे काहींनी सांगितले. मात्र गेल्या 5 महिण्यापासुन या वायरकडे कोणाचेही लक्ष गेले नाही व तेव्हापासुनच त्यांचा विद्युत पुरवठा बंद आहे.
 
बुधवारी दुपारी आलेल्या वार्‍यामुळे सदर वायरचा स्पर्श टिनाला झाला. वायर सुरूच असल्यामुळे तो विद्युत प्रवाह खालपर्यंत उतरला. खाली असलेल्या एका वस्तुला ताहेरा परविन यांची मुलगी मुस्कान मोहम्मद रफीक या चिमुकलीचा स्पर्श झाला. त्यामध्ये विद्युत प्रवाह वाहत असल्याने मुस्कान मो. रफीक हिला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यानंतर मुस्कानला एका खाजगी रूग्णालयात तत्काळ नेण्यात आले, परंतु तिथे तिला मृत घोषीत करण्यात आले. सद्यास शवविच्छेदनासाठी मुस्कानचा मृतदेह स्थानिक ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला. गुरूवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या घटनेत मृतकाची आई ताहेरा परविन, मामी मुस्कान मोहम्मद सुलेमानव मावशी जायदा परविन या सुध्दा किरकोळ जखमी झाल्या आहे. सदर घटनेला महावितरण कंपनी जबाबदार असुन दोषीवर तत्काळ कारवाई करावी या मागणीचा सुर परिसरातुन ऐकावयास मिळत आहे.