अमरावतीत वादळासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

    दिनांक :05-Jun-2019
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अनेक घरांचे नुकसान 

 
तभा ऑनलाईन टीम  
अमरावती,
जिल्ह्यात बहुतांश भागात वादळासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडच झाली. काही ठिकाणी फक्त वादळच होते तर काही भागात वादळासह पाऊस कोसळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वादाळामुळे मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावणामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून दिलासा मिळाला.
  
हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यात बुधवारी मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणार, अशी शक्यता वर्तविली होती. ती खरी ठरली. जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच ढगाळ वातावरण होते. काही भागात मंगळवारी पाऊसही झाला होता. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते. पण, दूपारनंतर वादळाला सुरूवात झाली. अमरावती शहरात रिमझीम पाऊस आला. जिल्ह्यातल्या अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, भातकुली, वलगाव, दर्यापूर, अंजनगाव या भागात पावसाने हजेरी लावली. अमरावती शहरात सांयकाळी विजेचा जोरदार कडकडाट सुरू होता. 
 
 
परतवाडा-अचलपूरात पाऊस
 
अचलपूर : गेल्या तीन महिन्यापासून प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना बुधवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या हलक्या सरीने काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुष्काळाच्या झळा सोसत असताना सायंकाळच्या सुमारास जुळ्या शहरासह तालुक्यात मान्सून पुर्व पावसाच्या सरी कोसळल्या. बळीराज्यालाही शेतीच्या अंतिम मशागतीला फायदेशीर ठरणार्‍या या सरींनी चांगलाच दिलासा मिळाला आहे. तास भर बरसलेल्या सरींनी जुळ्या शहरातील अनेक भागातील विज देखील गुल केली होती. विज वितरण व नगरपालिकेच्या मान्सून पुर्व तयारीची वाट लावली. काही भागात नाल्यात कचरा, प्लास्टीक पण्णी अटकल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. अचानक आलेल्या वादळी पावसाने जनमानसात आंनद निर्माण झाला असला तरी मान्सून पावसाची अजुन वाट बघावी लागणार आहे.
 
नांदगाव खंडेश्वर तालुक्याला झोडपले
 
नांदगाव खंडेश्वर : नांदगांव खंडेश्वर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील काही गावांना चांगलेच झोडपून काढल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाचा सर्वात मोठा फटका विद्युत विभागाला बसला आहे. यामध्ये पापळ येथील 33 केव्ही सबस्टेशनमध्ये जाणार्‍या विद्युत लाईनचे 10 पोल कोसळल्याने मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या आहे. त्यामुळे परिसरातील लाईन बंद झाली.  या भागात काल प्रचंड वारा सुरु होता. अशातच विजांचा कडकडाटांसह गारा सुद्धा मोठ्या प्रमाणात पडल्या होत्या आणि सुमारे दोन तासांपर्यंत पाऊस सुद्धा पडल्याने प्रचंड गर्मीच्या उकाड्यात असलेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला. परंतु विद्युत पुरवठा बंद असल्याने त्यांना रात्र अंधारात काढावी लागली. यानंतर विद्युत कंपनी कडून तातडीने जमिनीवर पडलेले पोल व तारा उचलण्याचे काम सुरु केले. हे काम युद्धस्तरावर करणार असून तालुक्यातील काही भागातील विद्युत पुरवठा आणखी दोन दिवस बंद राहणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता व्हि.एन.शिंदे यांनी सांगितले. या वादळाने विद्युत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.