विद्यापीठाचा 196.14 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

    दिनांक :05-Jun-2019
अमरावती,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभागृहात मंगळवारी झाली. सभेत यावर्षीच्या 196.14 कोटीच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली.
 
 
सभापीठावर प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख उपस्थित होते. अधिसभेला सर्व अधिसभा सदस्य व विद्यापीठाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. अधिसभेच्या कामकाजा दरम्यान विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. अधिसभेत 2019-20 चा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रदीप खेडकर यांनी सादर केला. वार्षिक अहवाल उत्पल टोंगो यांनी सादर केला.
 
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये डॉ. मनिष गवई, डॉ. रवींद्र मुंद्रे, डॉ.आर.एम. सरपाते, डॉ.पी.बी. रघुवंशी, डॉ.बी.आर. वाघमारे, दिलीप कडू, व्ही.एम. मेटकर यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सभेच्या कामाकाजामध्ये मागील सभेचे कार्यवृत्त कायम करण्यात आले. याशिवाय सभेच्या कार्यवृत्तावरील अनुपालन अहवालाची नोंद सभेत सदस्यांनी घेतली. सदस्य डॉ. मनिष गवई, वसंत घुईखेडकर, जी.एम. कडू, डॉ. मुंद्रे, हिमांशू वेद यांनी विविध महत्वपूर्ण विषयांवर सभेत प्रस्ताव मांडलेत. त्यावर सभेत जवळपास सर्वच सभासदांनी सहभागी होवून आपले विचार मांडलेत. याशिवाय इतरही महत्वपूर्ण विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आले. आभार कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी मानले.