प्रत्येकवेळी प्रयोग यशस्वी होतातच असे नाही: अखिलेश

    दिनांक :05-Jun-2019
लखनऊ,
बसपा नेत्या मायावती यांनी समाजवादी पक्षाबरोबरची आघाडी तोडल्यानंतर सपा नेते अखिलेश यादव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होतो. त्यामुळे अनेकदा प्रयोग करावे लागले होते. अनेकदा प्रयोग अयशस्वी होतात. मात्र त्यातून कुठे कमी पडलो हे कळतं, असं सांगत बसपासोबतही असाच एक प्रयोग केला. तो अयशस्वी ठरला. मात्र आमच्या चूका त्यातून दिसून आल्या असं अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं. तसेच भविष्यात मायावतींसोबत पुन्हा आघाडी करण्याचे संकेतही दिले.
 
 
मी म्हैसूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्याने प्रत्येक प्रयोग यशस्वी होतोच असे नाही, हे मला चांगलं माहीत आहे. पण तरीही आम्ही एक प्रयोग करून पाहिला. त्यातून आम्ही कुठे कमी पडतोय, हे सुद्धा आमच्या लक्षात आले, असं अखिलेश म्हणाले. मायावती यांच्याबद्दल असलेला आदर पुढील काळातही कायम राहिल. माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेत मी जे मायावतींबद्दल बोललो त्या मतावर मी आजही ठाम आहे, असंही ते म्हणाले. आघाडी तुटल्याने आगामी काळात कशी राजकीय वाटचाल करायची हे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून ठरवण्यात येईल. तसेच २०२२ च्या निवडणुकीत काय रणनिती आखायची हे पक्ष नंतर ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हा दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.