48 तासांनंतरही हवाई दलाचे AN-32 बेपत्ताच

    दिनांक :05-Jun-2019
सोमवारी हवाई दलाचे AN-32 हे विमान बेपत्ता झाले होते. त्यानंतर सर्वच यंत्रणांनी शोधमोहिम सुरू केली होती. हवाई दलाचे AN-32 हे विमान बेपत्ता होऊन 48 तासांचा कालावधी लोटला आहे. परंतु या विमानाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान हवाई दलाची विमाने, हेलिकॉप्टर आणि सैन्य दलाच्या मदतीने या विमानाचा शोध सुरू आहे. तसेच इस्रोदेखील उपग्रहाच्या मदतीने या विमानाचा शोध घेत आहे.

 
 
भारतीय हवाई दलाचे AN-32 हे विमान सोमवारी दुपारी एक वाजता बेपत्ता झाले होते. या विमानाने दुपारी 12.25 मिनिटांनी आसाममधील जोरहाट हवाई तळावरून अरुणाचल प्रदेशमधील अॅडवांस लँडिंग ग्राउंड मेचुकासाठी उड्डाण घेतले होते. परंतु दुपारी एकच्या सुमारास या विमानाचा नियंत्रण कक्षाशी अखेरचा संपर्क झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या विमानाचा संपर्क झाला नव्हता. 8 कर्मचारी आणि 5 प्रवाशांसह एकूण 13 जण या विमानात होते.
 
 
दरम्यान, विमानातून प्रवास करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना याबाबत सुचना देण्यात आली आहे. तसेच शोधकार्याबाबतही त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात येत असल्याची माहिती हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अनुपम बॅनर्जी यांनी दिली. रशियाने तयार केलेल्या AN-32 या विमानाचा हवाई दलात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यापूर्वी जून 2009 मध्ये अरूणाचल प्रदेशच्या पश्चिम सियांग जिल्ह्यातील एका गावात AN-32 विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये चेन्नईवरून पोर्ट ब्लेअरला जाणारे AN-32 विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये हवाई दलाचे 12 जवान, 6 कर्मचारी, 1 नौदलाचा जवान, 1 सैन्यदलाचा जवान आणि एका कुटुंबातील 8 सदस्य होते. 1 पाणबुडी, 8 विमाने आणि 13 युद्धनौकांच्या मदतीने या विमानाचा शोध घेण्यात आला होता. यानंतरही या विमानाबद्दल माहिती मिळाली नव्हती.