#ICCWorldCup2019 : दक्षिण आफ्रिकेचे भारताला २२८ धावांचे आव्हान

    दिनांक :05-Jun-2019
युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर, पहिला विश्वचषक सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला २२७ धावांवर रोखलं आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारताला २२८ धावांची आवश्यकता आहे. सलामीच्या फळीतील फलंदाजांचं अपयश हे आफ्रिकन संघाच्या खराब कामगिरीचं कारण ठरलं. आफ्रिकेकडून मधल्या फळीत ख्रिस मॉरिसने आश्वासक फलंदाजी केली. 

 
नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. जसप्रीत बुमराहने हाशिम आमला आणि क्विंटन डी-कॉक यांना माघारी धाडत आफ्रिकेला बॅकफूटला ढकललं. यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि वॅन डर डसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र चहलने डसन आणि डु प्लेसिस यांना ठराविक अंतराने माघारी धाडत भारताचं पारडं पुन्हा एकदा जड केलं.
मधल्या फळीत भरवशाच्या जे.पी.ड्युमिनीलाही फारशी चमक दाखवता आली नाही. तो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यानंतर फेलुक्वायो आणि ख्रिस मॉरिस यांनी सातव्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून युजवेंद्र चहलने ४ बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ तर कुलदीप यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली.