व्हॉट्सअॅपमध्ये शोधला बग; भारतीय विद्यार्थ्याला बक्षीस

    दिनांक :05-Jun-2019
नवी दिल्लीः
प्रसिद्ध मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये एक बग शोधून काढल्यामुळे एका भारतीय विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात आले आहे. बग म्हणजे अॅपमधील एक छोटीशी चूक किंवा कमतरता होय. व्हॉट्सअॅपमधील कमतरतेचा शोध लावण्याची किमया केरळमधील अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव अनंतकृष्णा आहे. व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या व्यक्तीच्या नकळत दुसरी व्यक्ती त्याच्या व्हॉट्सअॅपमधील माहिती किंवा डेटा नष्ट करण्याची सूट मिळत असे. म्हणजेच आपल्या नकळतपणे व्हॉट्सअॅपचा वापर करणारी व्यक्ती आपल्या फोनमधील माहिती डिलिट करू शकते, असा बग अनंतकृष्णाने शोधून काढला.
 
 
मीडिया रिपोर्टनुसार, अलपुझा येथील रहिवासी असलेल्या अनंतकृष्णाने दोन वर्षांपूर्वी हा बग शोधून काढला होता. यानंतर त्याने फेसबुकच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. एवढेच नव्हे, तर अनंतकृष्णाने हा बग दूर करण्याचा उपायही सूचवला. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी अनंतकृष्णा यांनी दिलेली माहिती तपासून पाहिली आणि तथ्य समोर आल्यावर अनंतकृष्णाला सन्मानित करण्याचे ठरविले. फेसबुकने अनंतकृष्णाला ५०० डॉलर (सुमारे ३४ हजार रुपये) बक्षीस म्हणून दिले. त्याचप्रमाणे मानाच्या हॉल ऑफ फेम यादीत अनंतकृष्णा यांचा समावेश केला आहे. हॉल ऑफ फेम म्हणजे अशी यादी ज्यात व्हॉट्सअॅपमधील कमतरता, त्रूटी किंवा बग शोधणाऱ्या व्यक्तींचा समावेश असतो.