अखेर कांद्रीबाबा मंदिराचे कपाट उघडले

    दिनांक :05-Jun-2019
आदिवासींच्या धार्मिक भावनांचा महाविजय
 
 
धारणी,
तारुबांदा जंगलातील पौराणिक कांद्रीबाबाच्या मंदिराची दारे आता भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय अखेर व्याघ्र प्रकल्पाने घेऊन आदिवासी भक्तांच्या धार्मिक भावनांचा मान ठेवलेला आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत असून प्रस्तावित आंदोलन तुर्त स्थगित झालेले आहे.
 
व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक शिवकुमार आणि मेळघाटचे आ. प्रभुदास भिलावेकर यांचे दरम्यान झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्याघ्रने मंदिरात आदिवासींचा प्रवेश निश्चित करुन पुजा पाठ करण्याची परवानगी दिलेली आहे. या बैठकीत जि.प. सदस्य महेंद्र गैलवार, उपसभापती जगदीश हेकडे, गणपत गायन, तारुबांदाचे सरपंच, माजी सरपंच, मंदिराचे पुजारी, वन समिती सदस्यांसोबत डी.एफ.ओ. शिवकुमार, रेंजर मोरे व रेंजर दिपाली चौहान यांची उपस्थिती होती. मंदिर प्रवेश अडविल्यावरचा मुद्दा प्रभुदास भिलावेकर तथा महेंद्र गैलवार यांनी प्रकर्षाने मांडल्यानंतर शिवकुमार यांनी बंदी न घालण्याचे कबूल करुन भाविकांना कांद्री मंदिरात पूजा-पाठ करण्यास परवानगी देण्याचे स्विकार केले.
 
आ. भिलावेकर यांनी तारुबांदाच्या विश्रामगृहासमोर खोदलेल्या खड्यांना बुजवून रस्ता सरळ करण्याचे निर्देश व्याघ्र प्रकल्पाला देतांना मेळघाटचे जंगल, वनसंपदा आणि वन्यजीव हे आदिवासी संस्कृतीमुळेच वर्षानुवर्षापासून सुरक्षीत असल्याचे भान वनअधिकार्‍यांना करुन दिले. मेळघाटातील आदिवासी हे निसर्गपूजक असल्याने सर्व देवस्थान प्रकृतीच्या कुशीत आहेत. कांद्रीबाबाचे अनन्य महत्व असल्याने दर्शनासाठी यापुढे व्याघ्रने अडथडा आणू नये, असे स्पष्टपणे आ. भिलावेकर यांनी अधिकार्‍यांना सांगितले. दर्शनासाठी कोणालाच रोखण्यात येणार नाही. मात्र जंगलात आग लागेल, असे कृत्य भक्तांनी करु नये, तर दिवसाच धार्मिक विधी करण्याची विनंती शिवकुमार यांनी आदिवासींना केली.
 
कांद्रीबाबा मंदिर हे क्रिटीकल टायगर हॅबीटेड म्हणून नोंदलेले असून इंग्रज काळापासून रंगरावचे जंगल नावाने ओळखले जाते. खंड क्रमांक 766 कांद्रीबाबा मंदिराचे द्वार आता उघडण्यात आलेले आहे. भाविकांनी वनसंरक्षण आणि वन्यप्राणी रक्षणाविषयी नियम कायदे पाळून दर्शन करावे व व्याघ्र प्रकल्पास सहयोग करण्याची विनंती रेंजर मोरे यांनी आदिवासी भक्तांना केलेली आहे.