लिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळीची कारणे

    दिनांक :05-Jun-2019
१. रोगांमुळे होणारी फळगळ : लिंबूवर्गीय झाडांमध्ये फळगळ प्रामुख्याने बोट्रिओडिप्लोडिया थिओब्रोमी, कलेटोट्रिकम ग्लोअीस्पोरिऑइड्‌स व काही अंशी अल्टरनेरिया सिट्री या बुरशीमुळे होते. या बुरशी फळांच्या देठांमधून फळांमध्ये प्रवेश करतात व पूर्ण वाढ झालेल्या फळांचे नुकसान करतात. या बुरशीचे जीवाणू झाडांवर जुन्या वाढलेल्या फांद्या जास्त असतील तर मोठ्या प्रमाणात पसरतात तसेच काही कीटकांच्या प्रादुर्भावामुळे जसे काळी माशी, मावा, तुडतुडे त्याच्या शरीरातून निघालेल्या शर्करायुक्त तरल पदार्थावर वाढलेल्या बुरशीमुळे पेशीक्षय लवकर होतो व परिणामी फळगळ वाढते. या प्रकारची फळगळ 10 टक्के वाळलेल्या फांद्या असलेल्या झाडांवर 22 टक्केपर्यंत होते. 
 
 
२. रोगांमुळे होणारी फळगळ व त्याचे व्यवस्थापन : बुरशीचा प्रादुर्भाव फळांची साल व देठ यांचे जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात व तो भाग कुजतो आणि फळांची गळ होते. आंबिया बहाराच्या फळांची बुरशीजन्य रोगांमुळे होणारी गळ कमी करण्यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम िंकवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम + 10 लिटर पाणी या बुरशीनाशकाच्या एक महिन्याचे अंतराने जुलैपासून तीन फवारण्या कराव्यात. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने झिंक, कॅल्शियम, करीता 60 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये सूक्ष्मअन्नद्रव्ये मिसळून 15 ते 20 दिवसांचे अंतराने दोन ते तीन वेळा फळांवर वेगळी फवारणी करावी. फळगळ थांबविण्याकरिता प्लॅनोफिक्सची पहिली फवारणी फळे बोराएवढी असताना व दुसरी फवारणी फळे काढणीच्या एक महिन्याअगोदर 50 मि.ली. 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून करावी.
 
३. नैसर्गिक गळ : फेब्रुवारी-मार्च महिन्यात फळधारणा झाल्यानंतर उष्णतामानात एकदम झालेली वाढ हे एक प्रमुख कारण आहे. शिवाय दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात या काळात जास्त फरक असल्यामुळे फळांची गळ जास्त होते. संत्र्याच्या झाडावर नैसर्गिकपणे आवश्यकतेपेक्षा जास्त फुले येत असल्यामुळे फळे टिकून राहण्याकरीता त्यांच्यात स्पर्धा निर्माण होते आणि जेवढ्या फळांना झाडावर पोसण्याची क्षमता त्या झाडात असते तेवढीच फळे झाडावर टिकून राहतात. त्यामुळे नैसर्गिक फुलांची व फळांची गळ होत असते.
 
आंबिया बहार हा थंडीच्या काळानंतर येत असल्यामुळे व झाडांना नैसर्गिक ताण बसत असल्यामुळे जवळजवळ अंदाजे 60 टक्के फुले या बहारात झाडावर येतात. याउलट मृग बहार घेताना एप्रिल व मे महिन्यात तापमानात इतकी वाढ होते की, झाडांची नुसती वाढच खुंटत नाही तर झाडांच्या फांद्यांची शेंडे, फांद्यांची साल, पाने इत्यादी उष्णतेमुळे वाढतात. या काळात झाडाला ताण बसतो तो नैसर्गिक स्वरूपाचा नसून त्याला फोर्स बहार म्हणतात आणि म्हणूनच या बहारात झाडे लवकर खराब होतात.
आंबिया बहाराच्या फळांची गळ कमी करण्याकरिता करावयाची उपाययोजना :
 
1) खताची (सेंद्रिय व रासायनिक) मात्रा योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावी. नत्राची अर्धी मात्रा पहिले पाणी देण्याचे वेळी द्यावी व उरलेली अर्धी मात्रा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावी.
2) पाण्याच्या पाळ्या 8 ते 12 दिवसांच्या अंतराने योग्य प्रमाणात दुहेरी रिंग पद्धतीने द्याव्यात. पाणीटंचाई असल्यास उभ्या आडव्या दांड पद्धतीने पाणी द्यावे.
3) पावसाळ्यात बागेत पाणी साचू न देता पाण्याचा निचरा होण्याची काळजी घ्यावी. मुख्यतः ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बागेत पाणी साचून राहिल्यास पाण्याचा निचरा न झाल्यास आंबिया बहारात फळांची गळ फार होते.