‘जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जाएगा’, ममतांचा नवा नारा

    दिनांक :05-Jun-2019
कोलकाता,
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोलकातामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने बुधवारी (5 जून) ममता यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं आहे. त्यावेळी त्यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. 'त्यागाचे नाव हिंदू आहे, इमान म्हणजे मुसलमान, प्रेम म्हणजे ख्रिश्चन तर शिखांचे नाव आहे बलिदान. असा आहे आपला प्रिय हिंदुस्तान याचे रक्षण आम्ही करू. जो हमसे टकराएगा वो चूर चूर हो जाएगा आणि हा आमचा नारा आहे' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
 
 
ममता यांनी 'मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर-ए-खुदा होता है' हा शेर देखील सादर केला.
 
 
 
सूर्य उगतो तेव्हा त्याची किरण खूप प्रखर असतात ती नंतर कमी होतात, त्यामुळे घाबरू नका जेवढ्या झपाट्याने त्यांनी ईव्हीएमवर ताबा मिळवला तेवढ्याच लवकर ते जातील असंही ममता यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच मतदान बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेतलं जावं याची मागणी लावून धरण्याचं आवाहन ममता यांनी इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही केलं आहे.