येत्या ४८ तासात केरळमध्ये मान्सून येण्याची शक्यता

    दिनांक :05-Jun-2019
- स्कायमेटने वर्तवला अंदाज
वाढते तापमान आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. ती म्हणजे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या आठवडाभरात तो राज्यातही दाखल होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थीती निर्माण झालेली असल्याने बळीराजासह सर्वचजण पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, यंदाचा मान्सून हा कमजोर राहिल असे भाकीतही हवामान तज्ज्ञांनी वर्तवले आहे.

 
हवामानाचा पूर्वानुमान वर्तवणारी संस्था स्कायमेटचे वैज्ञानीक समर चौधरी यांनी सांगितले की, येत्या ४८ तासांत केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची आशा आहे. मात्र, यंदा मान्सूनचा जोर काहीसा कमजोर राहणार आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात मान्सून सर्वसाधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात येतो. तर महाराष्ट्रात तो ७ जूनपर्यंत दाखल होतो. मात्र, यंदा मान्सूनला उशीर झाल्याने राज्यात तो दाखल व्हायला १०-१५ दिवसांचा उशीर होऊ शकतो.
 
 
चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, यंदा गेल्या ६५ वर्षातील दुसरा सर्वाधीक भीषण दुष्काळ आहे. मान्सूनपूर्व सर्वसाधारण पाऊस हा १३१.५ मीमी इतका असतो. मात्र, आत्तापर्यंत नोंद झालेला पाऊस ९९ मीमी इतका आहे. अल निनोचा प्रभाव असल्याने यंदा मान्सूनवर परिणाम झाला आहे.