ईदच्या निमित्तानं 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

    दिनांक :05-Jun-2019
नवी दिल्ली,
नरेंद्र मोदी सरकारनं ईदच्या निमित्तानं मुस्लिम विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकारनं प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा 5 कोटी मुस्लिम विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणार असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली, त्यानंतर मुस्लिम समुदायातील 5 कोटी मुस्लिमांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत लाभ मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि पारदर्शी करण्यात आली आहे.
 
 
नक्वी म्हणाले, विकासाच्या गाडीला विश्वासाच्या महामार्गावर पळवणे हा येत्या पाच वर्षातील आमचा अजेंडा आहे. जेणेकरून प्रत्येक गरजवंताच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. विश्वासाच्या या हायवेवर कोणताही गतिरोधक किंवा अडथळा येऊ देणार नाही. यासाठी आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे. '3 ई' म्हणजे शिक्षण, रोजगार आणि सशक्तीकरण हे आमचं लक्ष्य आहे. ही लक्ष्य गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पढो-बढो हे अभियान चालवलं जाणार आहे. शिक्षणासाठी मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून प्रसार करण्यात येणार असून, देशभर हे अभियान चालवलं जाणार आहे.