पाणी प्रश्नावरून कोणी राजकारण करू नये : शरद पवार

    दिनांक :05-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
बारामती,
सध्या राज्यभर नीरा नदीच्या पाण्याची चर्चा सुरू आहे. पाण्याच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये असे माझे मत आहे. सबंध महाराष्ट्रात आज पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. अशावेळी सामंजस्याने वागण्याची गरज आहे. राजकारण कुठे करावे याचे तारतम्य जपले पाहिजे. भागा-भागात जिल्ह्या-जिल्ह्यात दुरावा निर्माण होता कामा नये, तशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
 
 
पश्चिम महाराष्ट्रात पाण्यावरून राजकारण सुरु झालं आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल, असे महाजन म्हणाले होते. याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.