आर्थिक तंगीमुळे पाकिस्तान करणार लष्करी खर्चात कपात

    दिनांक :05-Jun-2019
- लष्कराचा अभूतपूर्व स्वेच्छा निर्णय
इस्लामाबाद,
इकडे आर्थिक संकटाने पाकिस्तानची दैना उडाली असताना, पाकिस्तानी लष्कराने ‘स्वेच्छेने’ लष्करी खर्चात कपात करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. आगामी अर्थसंकल्पात लष्करी खर्चात कपात करण्यात येणार असल्याची माहिती पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी टि्‌वटरद्वारे दिली आहे. लष्करी खर्चात कपात करण्यात येणार असली, तरी देशाच्या सुरक्षेशी कोणताही तडजोड करण्यात येणार नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे. परंतु, हे विधान परस्परविसंगत असल्याचे मत लष्करी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
लष्करी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी नेमकी किती कपात करण्यात येणार आहे, हे मात्र लष्कराने स्पष्ट केलेले नाही. याबाबतची माहिती सार्वजनिक करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करीत आहे. त्यासाठी सरकारने कमीतकमी खर्च करण्याचे आवाहन विविध सरकारी संस्थांना केले आहे. खर्च कमी करण्यासाठी सरकारने मोहीमही सुरू केली आहे, हे येथे उल्लेखनीय.
 
विशेष म्हणजे, पाकिस्तानी लष्कराने घेतलेल्या खर्चाच्या कपातीच्या निर्णयाचे कौतुक पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. देशासमोरील आर्थिक संकट लक्षात घेता हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. सुरक्षा दलासमोर अनेक आव्हाने असतानाही त्यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.
 
आपल्या टि्‌वटमध्ये गफूर यांनी म्हटले की, देश सध्या आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने, एका वर्षासाठी आम्ही लष्करी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी देशाच्या सुरक्षेसाठी लष्कर सदेव सज्जच राहणार असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, बलुचिस्तान आणि इतर दुर्गम भागातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी लष्कर सक्षम आहे. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. देशातील सर्व संस्थाच्या अशाच प्रकारच्या सहकार्याने देश या संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला आहे.