इंडिगोचे पहिले विमान पाकिस्तानमार्गे भारतात

    दिनांक :05-Jun-2019
बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ भारताने उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने भारताला हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर 30 मे पर्यंत ही बंदी वाढवण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. अखेर पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र खुले करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री भारताचे पहिले विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून दिल्लीत दाखल झाले. अहमदाबाद नजीक असलेला टेलेम एंट्री पॉईंट पाकिस्तानने रविवारी संध्याकाळी खुला केला. त्यानंतर दुबई ते दिल्ली जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाने या हवाई क्षेत्रातून भारतात प्रवेश केला.
 
 
दुबईवरून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर इंडिगो फ्लाईट ऑपरेशन्स सेंटरला पाकिस्तानच्या नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाच्या संचालकांचा एक फोन कॉल आला. इंडिगोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी याबाबत माहिती दिली. तसेच आपण विमानाचे मॉनिटरिंग करत असून तुमचे विमान यशस्वीरित्या विमानतळावर उतरल्याचे समजले आहे. तुम्हाला आम्ही शब्द दिला होता असे म्हणत त्यांनी ईदच्या शुभेच्छाही दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिला लँड पॉईंट रविवारी खुला करण्यात आला होता. त्यामार्गे पहिले विमान भारतात आले. 27 फेब्रुवारीनंर पाकिस्ताने सर्व 11 एन्ट्री पॉईंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतासहित दक्षिण आशियातील अन्य देशांना आणि पश्चिमी देशांना दूरच्या मार्गाचा अवलंब करावा लागत होता. दरम्यान, टेलेम एन्ट्री पॉईंट खुला केल्यानंतर त्या मार्गावरून विमानाच्या उड्डाणाची चाचणी करण्याची सूचना पाकिस्तानने दिली होती. त्यानंतर दुबई दिल्ली जाणारे विमान सोमवारी यामार्गे भारतात उतरवण्याची योजना आखण्यात आल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.