दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची मदत द्या

    दिनांक :05-Jun-2019
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी  

 
मुंबई,
सरकारने राज्यावरील दुष्काळाचे सावट पाहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पेरणी आणि पूर्व मशागतीच्या कामासाठी एकरी २५ हजाराची मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील लेखी निवेदन धनंजय मुंडे यांनी आज मंगळवारी सादर केले.
यावेळी खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. राज्यातील २८ हजार ५२४ दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांना मोफत बीयाणे देण्याची योजना राज्य सरकारच्या विचारात असल्याचे वक्तव्य महसूल व कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असले तरी अद्याप लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. गेल्या ४ वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आलाय. सरकारच्या अनेक जाचक अटींमुळे शेतकऱ्याला कर्जमाफी योजपासून वंचित रहावे लागत आहे. यावर तोडगा काढून शेतकऱ्यापुढील संकटाचे ओझे कमी करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.