पवार रुसले आणि चुकीच्या ठिकाणी बसले

    दिनांक :05-Jun-2019
मोदी सरकारच्या दुसऱ्या शपथविधी कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना पाचव्या रांगेतील पास दिल्याने मानापमानाचे नाट्य घडले होते. अपमानास्पद वागणूक दिल्याचे कारण सांगत पवारांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. मात्र, या वादावर आता राष्ट्रपती भवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून शरद पवारांना पाचव्या रांगेचा नव्हे तर पहिल्याच रांगेतील व्हीव्हीआयपी पास देण्यात आला होता, असे सांगण्यात आले आहे.

 
राष्ट्रपती भवनाचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, शरद पवारांना व्हीव्हीआयपी सेक्शनमध्ये पहिल्याच रांगेत जागा देण्यात आली होती. ३० मे रोजी झालेल्या मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांना ‘V’ सेक्शनमध्ये बसण्याचे निमंत्रण देण्यात आले होते जिथे सर्वात वरिष्ठ नेत्यांसाठी जागा राखीव असते. त्यामुळे पवारांच्या पासवरील ‘V’ हे लेबल पहिल्याच रांगेसाठी देण्यात आले होते. मात्र, पवारांच्या कार्यालयाचा या ‘V’ लेबलवरुन गोंधळ झाला असावा आणि त्याला ते पाचवी रांग समजले असावेत, असे मलिक यांनी म्हटले आहे.
 
माध्यमांमध्ये या वादाबाबत आलेले वृत्त आणि याबाबत राष्ट्रपती भवनाकडे आलेल्या तक्रारींनंतर मलिक यांनी याबाबत ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, यासंदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या विविध वृत्तांनुसार, पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रोटोकॉलचे पालन करण्यात न आल्याचे सांगत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे याबाबत खुलासा करण्यात आला आहे.