थंपी व रॉबर्ट वढेरांच्या बयाणात प्रचंड तफावत

    दिनांक :05-Jun-2019
- ईडी मागणार कोठडी
नवी दिल्ली,
विदेशात बेहिशेबी संपत्ती खरेदी करणारे रॉबर्ट वढेरा आणि त्यांचे जवळचे व्यावसायिक मित्र सी. सी. थंपी यांच्यातील बयाणांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आहे. कॉंगे्रसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे खाजगी सचिव माधवन्‌ यांनी वढेरा यांची माझ्यासोबत ओळख करून दिली, अशी माहिती थंपीने ईडीला दिली, तर वढेरांनी मात्र, अमिरातला जाताना विमानात मी थंपीला भेटलो होतो, अशी माहिती मंगळवारी ईडीच्या अधिकार्‍यांना दिली.
 
 
 
रॉबर्ट वढेरा यांनी दुबई व लंडन येथे बेहिशेबी मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. वढेरा यांनी दुबईत 14 कोटी रुपयांचा बंगला आणि लंडन येथील ब्रेन्स्टन स्क्वेअर येथे 26 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केल्याचे, तसेच थंपीने ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी वढेरांना मदत केल्याचा आरोप आहे.
 
ईडीच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी वढेरा यांची सुमारे सहा तास चौकशी केली. यावेळी त्यांनी सुमारे 10 प्रश्नांवर विसंगत उत्तरे दिली. थंपीचा कबुलीजबाब समोर ठेवून ईडीच्या अधिकार्‍यांनी वढेरांवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी 10 प्रश्नांची उत्तरे देताना वढेरांची दातखळी बसली होती. तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ईडीने त्याची कोठडी मागण्याचा निर्णय घेतला असून, एक-दोन दिवसांतच तसा अर्ज सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
सुमीत चढ्‌ढाला तुम्ही ओळखता काय, असे विचारले असता, वढेरा म्हणाले की, या नावाच्या व्यक्तीला मी कधीच भेटलो नाही आणि ओळखतही नाही. त्यांचे हे विधान 7 फेबु्रवारीचे होते. परंतु, 14 जानेवारी रोजी वढेरा यांच्या एका जवळच्या साथीदाराची चौकशी करण्यात आली असता, संजय भंडारीच्या माध्यमातून चढ्ढा आणि वढेरा यांची मैत्री झाली होती, असे त्याने सांगितले होते. भंडारी, वढेरा आणि चढ्ढा यांच्यात ई-मेलने झालेल्या व्यवहाराचे पुरावेही ईडीकडे उपलब्ध आहेत. यावरून वढेरा आणि चढ्ढा एकमेकांना ओळखतात, हे सिद्ध होते. त्यामुळे या संबंधी वढेराची सखोल चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी मागण्याची तयारी ईडीने केली आहे.