बलात्कारप्रकरणात इअरफोन ठरला महत्त्वाचा पुरावा

    दिनांक :05-Jun-2019
भारतीय तरुणाला ७ वर्षांचा तुरुंगवास
युरोपमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी भारतीय तरुणाला स्थानिक न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अजय राणा असे या तरुणाचे नाव असून अजय राणाकडील इअरफोन हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. इंग्लंडमधील सफोल्क येथे ९ डिसेंबर २०१७ रोजी अजय राणाने एका महिलेला कारमध्ये लिफ्ट दिली. अजय राणा हा टॅक्सीचालक म्हणून काम करायचा. काही वेळाने अजयने कार निर्जनस्थळी थांबवली आणि महिलेवर बलात्कार केला. अथक प्रयत्नानंतर महिलेने कारमधून पळ काढला आणि घटनास्थळापासून काही अंतरावर राहणाऱ्या मित्राचे घर गाठले.

 
 
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी टॅक्सीचालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. सीसीटीव्ही आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी अजय राणाची ओळख पटवली. अजय हा सफोल्कमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. पोलीस त्याच्या मित्रापर्यंत पोहोचले. अजय हा १२ डिसेंबर रोजी लंडनला गेल्याचे त्याच्या मित्राने सांगितले. आई आजारी असल्याने भारतात परत जातोय, असे त्याने मित्राला सांगितले होते. पोलीस अजयपर्यंत पोहोचण्यापूर्वीच तो १३ डिसेंबर रोजी भारतात पोहोचला होता. अजय राणानेच हा गुन्हा केला हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांसाठी इअरफोन हा महत्त्वाचा पुरावा ठरला. इअरफोनवरील डीएनएचे नमुने आणि बलात्कार पीडित महिलेच्या कपड्यांवरील डीएनएच्या नमुन्यांसोबत तपासणी करण्यात आले आणि हा आरोपीविरोधात महत्त्वाचा पुरावा होता.
अखेर इंग्लंड पोलिसांनी राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु केले. त्याच्याविरोधात युरोप महासंघाने अटक वॉरंटही काढले. स्पेन पोलिसांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये अजय राणाला अटक केली. यानंतर त्याला इंग्लंड पोलिसांकडे सोपवण्यात आले. या खटल्याची इप्साविच क्राऊन कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने त्याला दोषी ठरवत सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.