अमरावतीत शिवशाहीला आग

    दिनांक :06-Jun-2019
सर्व प्रवाशी सुखरूप
अमरावती,
अकोल्यावरुन नागपुरकडे जाणार्‍या शिवशाही बसला आज गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास शहरातल्या अत्यंत गजबजलेल्या राजकमल चौकात अचानक आग लागल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. सदर घटना लगेच लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. उच्च तापमानामुळे बसमधल्या वातानुकुलीत यंत्रणेने पेट घेतल्यामुळे ही आग लागली होती. 

 
 
 अकोला आगाराची एमएच 09 ईएम 2264 क्रमांकाची शिवशाही बस अकोल्यावरुन नागपुरकडे निघाली होती. मार्गात राजापेठ बसस्थानकावर काही वेळ थांबल्यानंतर बस पुढील प्रवासासाठी निघाली. बस राजकमल चौकाजवळ पोहोचताच पाठीमागच्या चाकाजवळून मोठ्या प्रमाणात धुर निघायला लागला. हा प्रकार काही नागरिकांनी चालकाच्या लक्षात आणून दिला. चालकाने क्षणाचाही विलंब न लावता शिवशाही बस थांबविली. सर्व प्रथम सर्व प्रवाश्यांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर चालक व वाहकाने बसमध्ये असलेल्या अग्निरोधक सिलेंडरमधील फोमचा शिडकाव सुरु केला. त्यानेही आग नियंत्रणात येत नसल्यामुळे आजुबाजुच्या नागरिकांनीही मिळेत तिथचे पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.
 
दरम्यान पोलीस तेथे पोहोचले. अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. अत्यंत वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच वाहतूक दुसर्‍या मार्गावरुन वळविली. वेगाने घटनास्थळावर पोहोचलेल्या अग्निशमनच्या पथकाने शिवशाही बसवर पाण्याचा वर्षाव सुरु केला. चारही बाजुने पाणी टाकल्यानंतर धुर निघण्याचा वेग कमी झाला. त्यानंतर ती बस चालकाने सुरु केली. हळुहळू ही बस मुख्य बसस्थानकापर्यंत नेण्यात आली. या बसमधली वातानुकूलीत यंत्रणा उच्च तापमानामुळे बाधीत झाली व तीने पेट घेतला. हळुहळू ती आग टायरपर्यंत पोहचली. सदर घटना वेळीच लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नागरिकांनी येथे मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वाहतूक व्यवस्थाही काही काळासाठी खोळंबली होती.