माझा अनपेक्षित पराभव, मात्र देशातील सत्तेचा आनंद

    दिनांक :06-Jun-2019
- भाजपा नेते हंसराज अहिर यांचे प्रतिपादन  

 
तभा ऑनलाईन टीम 
चंद्रपूर, 
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होतीच. जनतेला त्यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास होता. मी गृह राज्यमंत्री असतानाच माझ्या लक्षात आले होते की, देशात किती भयावह स्थिती आहे. कश्मिरपासून बंगालपर्यंत फुटीरतावादी प्रभावी होते. केरळ आणि तटीय भागात दहशतीचे वातावरण होते. ही काँग्रेसचीच देणे होती. त्याची झलक आता पाहायला मिळत आहे. मात्र, अशाही बिकट परिस्थितीचा सामना करण्याची ताकद मोदींमध्ये आहे, हेही जनतेला माहीत होते आणि म्हणून निर्विवाद बहुमत देऊन देशात त्यांचे हात बळकट केले गेले, यापूर्वीही देशहितात कामे झाली आणि पुढेही होईल, त्यामुळे माझ्या पराभवापेक्षा अवघ्या देशात भाजपाची सत्ता आली याचा अतीव आनंद आहे, या शब्दात माजी खासदार तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मनोगत व्यक्त केले.
 
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अहिर पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते. आज गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रपरिषदेत त्यांनी आपले मन मोकळे केले. पराभवाची कारणमिमांसा मी करणार नाही, ती पक्ष करेल. पण माझ्यासाठी भाजपाच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी कामे केली एवढे मी ठामपणे सांगतो, असे ते म्हणाले. मी पराभवाचा स्वीकार केला आहे. जनमताचा स्पष्ट कौल आहे, त्यात कुठलाही घोटाळा नाही. मी विजयी उमदेवाराचे अभिनंदनही केले आहे. ती आमची संस्कृती आहे. मी चारदा या मतदार संघातून लढलो, जिंकलो. पण कधी विजय विकत घेतला नाही. नागरिक लोकशाहीला धरून मतदान करतात, अशी माझी भावना आहे. 150 पेक्षाही कमी घरे असलेला मी खासदार आणि मंत्री होतो. लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिला. गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचा मी ऋणी आहे, अशी कृतज्ञताही अहिर यांनी व्यक्त केली.
 
पक्षवाढीसाठी विविध संघटनात्मक आघाडींवर काम केले. जबाबदार्‍या पार पाडल्या. पक्ष वाढला. वीर सावरकर यांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे पक्षाच्या कामातून अलिप्त राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचे काही कारणही नाही. पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारून काम करेल. जे माझ्या निवडणुकीच्या प्रचाराचे प्रभारी होते, त्यांना चिंता होतीच आणि पाचही विधानसभा क्षेत्रात भाजपाचे आमदार होते. राज्यात, देशात, एवढेच नव्हे, तर जिप, मनपा, नगरपालिका आणि अनेक ग्रामपंचायतींवर आमची सत्ता होती, आहे. मग पराभव कसा झाला, याचे आम्ही चिंतन करू, अशी कबुली अहिर यांनी दिली. यावेळी चंद्रपूरचे आमदार तथा महानगराचे पक्षाध्यक्ष नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर प्रभृती उपस्थित होते.