अप्पर वर्धा धरणातील गाळ काढण्याचे काम रखडले

    दिनांक :06-Jun-2019
महसूल विभागाची दिरंगाई
 
 
मोर्शी,
गत अनेक वर्षापासून अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात जमा झालेला गाळ काढण्याचे प्रत्यक्ष आदेश झाले असतानाही केवळ प्रशासकीय विभागांच्या समन्वयाअभावी व दिरंगाईमुळे हे काम रखडलेले आहे. परिणामी याही पावसाळ्यात हे काम होण्याचे चिन्ह दिसत नाही.
 
सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातील गाळ उपसण्याबाबत या भागाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी गत सहा महिन्यापासून अप्पर वर्धा विभागाकडे पाठपुरावा केला. शेतकर्‍यांच्या अनेक तक्रारी आमदारांपर्यंत पोहचल्याने संबंधित अधिकार्‍यांच्या संपर्कात राहून आमदारांनी प्रयत्न केले. गेल्या अनेक वर्षात या वर्षी धरणातील पाणीसाठा अगदी कमी म्हणजे 15 टक्क्यावर आला आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याची जागा रिकामी झालेली आहे. म्हणून याचवेळी गाळ काढणे सोपे होईल, हा यामागचा खरा उद्देश आहे. याबाबत अप्पर वर्धा धरण विभागाचे उपविभागीय अधिकारी पोटफाडे यांनी 29 मे रोजीच महसूलचे उपविभागीय अधिकारी हिंगोले यांना पत्र दिलेले आहे. मात्र, अद्यापही गाळ उपसण्याची परवानगी मात्र आलेली नाही. लाखो शेतकरी गाळ उपसण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रत्यक्ष प्रक्रियेला सहा महिन्यापासून सुरूवात होऊनही आता उन्हाळा संपत आला तरी कामाला सुरूवात होण्याचे चिन्ह दिसतच नाही. त्यामुळे डॉ. अनिल बोंडे व शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
 
गेल्या तीन वर्षात अत्यल्प पाऊस पडत आहे. शेतकरी दुष्काळी परिस्थितीत जीवन जगत आहेत. पाण्याची पातळी खोल गेल्याने नदी, नाले, विहिरी, बोअर पूर्णपणे कोरडे पडले आहेत. गेल्या 40 वर्षापूर्वी धरणाची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंतही धरण कोरडे पडले नव्हते, ते यावर्षी प्रथमच दिसून येत आहे. धरण पूर्णपणे गाळाने भरल्यानेच त्यात गेल्या काही वर्षापासून पाणी साठू शकले नाही. त्यामुळे लवकरच पाणीसाठी संपल्याचा भास होतो, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण खाली गाळ असल्याने वरच्या धरण पूर्ण भरल्याच्या पातळीपर्यंत पाणी गेले तरी प्रत्यक्षात पाणीसाठा कमीच राहतो. त्यामुळे प्रत्यक्ष पपाणीसाठ्याची स्थिती आणण्यासाठी या धरणातील गाळ काही वर्षापूर्वीच काढणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. आता डॉ. अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला असतानाही प्रशासकीय दिरंगाईत हे महत्वाचे काम रखडलेले आहे.
 
मध्यप्रदेशातून येणार्‍या वर्धा, जाम, माडू या नद्यांना पूर आले की, धरण त्वरित भरते. मात्र धरणात पूर्णपणे गाळ साठल्याने दोन पुरातच धरणाची पाण्याची पातळी 383.5 दिसून येते. ही पूर्ण पातळी समजल्या जाते. धरण पूर्ण भरल्याचे वाटत असले तरी ते गाळामुळे पूर्ण भरल्याच जात नाही. पूर्वी जलाशय पूर्ण भरण्याकरिता नद्यांना 7 ते 8 वेळा पूर आल्यावरच ते भरायचे. प्रतिवर्षी धरणात गाळ मोठ्या प्रमाणात साचत गेला, याची कबुली संबंधित अधिकारीच देत आहेत. प्रशासकीय स्तरावर कितीही कागदी घोडे नाचत असले तरी प्रत्यक्ष गाळ काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावरच घेतल्या जातो, असेही समजले आहे. मात्र, घोडे कुठे अडले हे समजायला मार्ग नाही.