चीनचे समुद्रातून अंतराळात रॉकेट लाँच

    दिनांक :06-Jun-2019
चीनने बुधवारी पहिल्यांदा समुद्रात तरंगणाऱ्या लाँच पॅडवरून अंतराळात यशस्वीरित्या रॉकेट लाँच केले. चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने याबाबत वृत्त दिले आहे. शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार शानडोंग प्रांतातील समुद्रातील तरंगणाऱ्या लाँच पॅडवरून चीनने हे रॉकेट लाँच केले. यामाध्यमातून चीनने तब्बल सात उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले. तरंगत्या लाँचपॅडवरून अंतराळात रॉकेट सोडणारा चीन हा तिसरा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका आणि रशियाने तरंगत्या लाँच पॅडवरून अंतराळात रॉकेट सोडले होते.

 
 
बुधवारी दुपारी चीनच्या वेळेनुसार 12 वाजून 6 मिनिटांनी लाँग मार्च-11 सॉलिड प्रोपेलंट कॅरिअर रॉकेट अंतराळात सोडण्यात आले. चीनच्या लाँग मार्च कॅरिअर रॉकेट सीरीजचे हे 306 वे अभियान आहे. अवकाशात सोडण्यात आलेल्या सात उपग्रहांपैकी 2 उपग्रह तंत्रज्ञानाच्या विकासासाठी वापण्यात येणारे उपग्रह आहेत. तर उर्वरित पाच लहान उपग्रहांचा वापर व्यावसायिक उपग्रह म्हणून करण्यात येणार आहे. या उपग्रहांपैकी 2 मोठे उपग्रह Bufeng-1A आणि Bufeng-1B ची निर्मिती चायना अॅकॅडमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी इन बिजिंगने केली आहे. याचा वापर हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठीही केला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून चीनने स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तसेच 2030 पर्यंत सुपरपावर बनण्याची चीनची इच्छा आहे.