ASUS ला झटका; झेनफोन विक्रीवर भारतात बंदी!

    दिनांक :06-Jun-2019
नवी दिल्ली,
दिल्ली उच्च न्यायालयाने ताइवान येथील स्मार्टफोन कंपनी ASUS वर भारतात 'झेन' आणि 'झेनफोन' ट्रेडमार्क असलेल्या उत्पादनांच्या विक्री आणि प्रचारावर बंदी घातली आहे. २८ मे २०१९ पासून पुढील ८ आठवडे आसुस कंपनीला झेन ट्रेडमार्क असलेले स्मार्टफोन्सची विक्री करता येणार नाही. त्यामुळे कंपनीला वेगळ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

 
टेलिकेयर नेटवर्क इंडिया प्राइवेट लिमिटेडने आसुसविरोधात 'झेन' ट्रेडमार्क वापरण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. टेलिकेअर नेटवर्क कंपनीने 'ट्रेड मार्क अॅक्ट १९९९' अंतर्गत झेन आणि झेनमोबाइल ट्रेडमार्कची नोंदणी केली होती. त्याअंतर्गत फीचर फोन, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि अॅक्सेसरीजची विक्री होणार होती. त्याचवेळी आसुसने २०१४ मध्ये 'झेनफोन' ट्रेडमार्कसह स्वत: बनवलेले स्मार्टफोन बाजारात आणले. यानंतर टेलिकेअर नेटवर्कने आसुसवर त्यांचा ट्रेडमार्क वापरल्याचा आरोप करत याचिका दाखल केली. या प्रकरणी ब्रॅण्डबेंचने अहवाल दिला आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आसुसने फसवणूक करून झेनफोन या ट्रेडमार्कचा वापर केला, असे दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केले. या याचिकेवरील पुढील सुनवणी १० जुलै रोजी होणार आहे.