आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची उंची वाढली

    दिनांक :06-Jun-2019
- एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली,
आंतरराष्ट्रीय पातळीवर मागील पाच वर्षांत भारताची उंची वाढली असल्याची जाणीव भारतीयांना झाली आहे, असे मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज गुरुवारी व्यक्त केले आहे. एखाद्या सनदी अधिकार्‍याने सरकारमधील महत्त्वाचे खाते सांभाळण्याचा हा दुर्मिळ योग आहे. परराष्ट्र व्यवहार सचिव म्हणून निवृत्त झालेल्या जयशंकर यांना नव्या जबाबदारीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, सरकार बाहेरून जसे दिसते त्यापेक्षा आतून वेगळे असते.
 
 
 
जागतिक संतुलनाचा काटा परत जागेवर येत असून, त्याचे प्रकटीकरण म्हणजे जागतिक पातळीवर चीन वेगाने पुढे येत आहे आणि पाठोपाठ भारतही आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची उंची वाढली असल्याची भारतातील कित्येक लोकांना जाणीव झाली आहे, असे त्यांनी येथे आयोजित एका चर्चासत्रात सांगितले.
 
भारतात बदल होण्याबाबतच्या लोकांच्या अपेक्षा केंद्र सरकारने केवळ जिवंतच ठेवल्या नाहीत, तर त्यांना बळकटीही दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. क्षेत्रीय संपर्क प्रकल्पांच्या माध्यमातून आपण क्षेत्राला जवळ आणू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
 
आर्थिक विकासाला वेग द्यायचा असल्यास, त्याच्या बाह्य पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयावर सर्वाधिक मोठी जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. व्यूहात्मक महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयावर मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.