कोर्टात हजर राहण्याची तारीख येताच प्रज्ञा सिंहांच्या पोटात दुखू लागले

    दिनांक :06-Jun-2019
भोपाळ,
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञा ठाकूर यांना बुधवारी रात्री पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र, एका कार्यक्रमासाठी त्यांना गुरावारी सकाळी सोडून देण्यात आले. प्रज्ञा या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत आणि त्यांना मुंबईतील एनआयए न्यायालयाने नुकतेच 7 जूनला हजर राहण्याचे आदेश दिले होते.

 
मिळालेल्या माहितीनुसार प्रज्ञा ठाकूर यांना आतड्याला संक्रमण झाले असून कंबर दुखी आणि उच्च रक्तदाब झाला आहे. डॉक्टर अजय मेहता यांनी, प्रज्ञा यांच्या आतड्याला सूज आणि रक्तदाबही वाढल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांना एक किंवा दोन दिवसांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
तर प्रज्ञा यांच्या सहकाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्या आज एका कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणले जाणार आहे. त्यांची सहकारी उपमा यांनी सांगितले की, त्यांची तब्येत ठीक नाहीय. उपचारासाठी त्यांनी आधीही हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्यांना पोटाशी संबंधीत आजार असून इजेक्शनमधून औषधे देण्यात आली आहेत. गुरुवारी सकाळी त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले असून त्या एका कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत.
यापूर्वी 3 जूनला मुंबईतील विशेष न्यायालयाने प्रज्ञाला आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर प्रज्ञाने आजारपण आणि संसदेतील कामकाज पूर्ण करण्याचे कारण देत खटल्यातील हजेरीपासून सूट देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायाधीशांनी यास नकार दिला होता. या प्रकरणात प्रज्ञाची उपस्थिती गरजेची असून त्यांना हजर राहावेच लागेल असे न्यायालयाने म्हटले होते.