नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या भेटीचे नियोजन नाही : परराष्ट्र मंत्रालय

    दिनांक :06-Jun-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत भेटीचे कोणतेही नियोजन नसल्याचे भारतीय परराष्ट्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे पुढच्या आठवड्यात ही परिषद होणार आहे.

 
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रविशकुमार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत कुठल्याही स्वरुपात भेटीचे नियोजन करण्यात आलेले नाही.
 
 
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सोहेल महमूद यांच्या भारतभेटीनंतर मोदी आणि खान यांची शांघाय सहकार्य परिषदेत १३-१४ जून रोजी भेट होईल अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, अशी कोणतीही भेट होणार नसल्याचे आज परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, भारताने हवाई कारवाई करीत पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनीही भारतीय हद्द घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मोदी-खान यांच्या भेटीबाबत सर्वांना उत्सुकता होती.
दरम्यान, इम्रान खान यांनी २६ मे रोजी नरेंद्र मोदींना फोन करुन दोन्ही देशांमध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी यासाठी परस्परांकडून प्रयत्न करण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मोदींनी उत्तरादाखल, परस्पर विश्वास निर्माण करताना, शांतता आणि समृद्धीसाठी हिंसाचार आणि दहशतवादमुक्त वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते.