त्यावेळी वैमानिकाची पत्नीच होती नियंत्रण कक्षात

    दिनांक :06-Jun-2019
नवी दिल्ली,
भारतीय वायुदलाचे एएन-32 मालवाहू विमान सोमवारी दुपारी बेपत्ता झाले. त्यावेळी या विमानाचे वैमानिक आशिष तन्वर यांची पत्नी नियंत्रण कक्षातच होती. तिने हा सर्व घटनाक्रम जवळून अनुभवला. एएन-32 ने दुपारी 12.25 च्या सुमारास आसामच्या जोरहट तळावरून अरुणाचल प्रदेशमधील मिचुका येथे जाण्यासाठी उड्डाण केले. त्यावेळी आशिष तन्वर यांची पत्नी संध्या वायुदलाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात कर्तव्यावर होत्या.
 
 
 
दुपारी एकच्या सुमारास विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर तासाभराने संध्याने आम्हाला दूरध्वनीवर काय घडले आहे त्याची कल्पना दिली, असे आशिषचे काका उदयवीर सिंह यांनी सांगितले. तन्वर कुटुंबीय मूळचे हरयाणाच्या पलवालचे आहे. एएन-32 विमानाचा अजूनही शोध लागलेला नसून, प्रत्येक तासागणिक कुटुंबाची चिंता वाढत चालली आहे.
 
सुरुवातीला आम्हाला विमान चीनच्या हद्दीत गेल्यानंतर तिथे आकस्मिक परिस्थितीत उतरवले असावे असे वाटत होते. पण, असे घडले असते, तर आतापर्यंत त्यांनी संपर्क साधला असता, असे उदयवीर िंसह यांनी सांगितले. अधिकार्‍यांना भेटण्यासाठी आशिषचे वडील आसामला गेले आहेत. त्याची आई घरीच आहे. या घटनेमुळे आई पूर्णपणे कोसळून गेली आहे, असे उदयवीर म्हणाले.
 
तन्वर कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा आहे. घरातल्या या वातावरणामुळे आशिषवर लहानपणापासून सैन्यदलांचा प्रभाव होता. देशसेवा करण्याची त्याची तीव्र इच्छा होती. आशिषची मोठी बहीण भारतीय वायुदलात स्क्वाड्रन लीडर आहे. दरम्यान, तन्वर कुटुंबीयांनी हे विमान चीनच्या हद्दीत गेले असावे, अशी शंका व्यक्त केली आहे.