संघाकडून शिका जनसंपर्क कसा ठेवायचा : शरद पवार

    दिनांक :06-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
पिंपरी- चिंचवड,
'जनसंपर्क कसा ठेवायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून शिका, त्यांच्यासारखी चिकाटी हवी,' असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज बुधवारपासून विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे.
 
पिंपरी- चिंचवडमध्ये शरद पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पवार यांनी संघ स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले. त्यासाठी एका खासदारांनी सांगितलेला किस्साच त्यांनी ऐकवला. 'संघाचे सदस्य कसा प्रचार करतात हे लक्षात घ्यायला हवे. ते पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि त्यातले एखादे घर बंद असले तर ते संध्याकाळी जातात. संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतात. हे त्यांच्याकडून शिकायला हवं,' असे ते म्हणाले.
 
 
 
 
'लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. पदाधिकाऱ्यांनी आजपासून एक निर्णय घ्यावा, प्रत्येकाला जो भाग वाटून दिला आहे त्या भागातील नागरिकांशी संपर्क साधावा, घरोघरी भेट द्यावी. मतदारांकडून सविस्तर माहिती घ्यावी. यामुळे मतदार असे म्हणणार नाही की निवडणुकीतच तुम्हाला आमची आठवण येते का?, असे शरद पवारांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल,' असेही त्यांनी सांगितले.
 
-advt- 
 तरुण भारतचे नवीन मोबाइल ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा  
 
 
पवार पुढे म्हणाले, एका भाजपाच्या खासदाराने मला संघाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली होती. संघाच्या एका स्वयंसेवकाला एखादा विभाग दिला आणि यादी दिली की तो पक्षाचे निवेदन घेऊन जातो. एखादे घर बंद असेल तर ते वारंवार त्या घरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधतात. पक्षाचे निवेदन प्रत्येकापर्यंत पोहोचेल यावर भर देतात. असा शिस्तबद्ध कार्यकर्ता पक्षासाठी उपयुक्त असतो आपण यातून शिकले पाहिजे, असे पवारांनी आवर्जून सांगितले.