बिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे

    दिनांक :06-Jun-2019
बिग बॉसच्या घरात कधी कोण कोणाचे मित्र होईल आणि कोण कोणाचे शत्रू याचा अंदाज लावणे अतिशय कठीण आहे. त्यात अभिजीत बिचुकले आणि शिवानी सुर्वे यांची नोकझोक तर सर्वांनाच माहीत झाली आहे. आजच्या एपिसोडमध्ये शिवानी पुन्हा एकदा अभिजीत बिचुकलेंची 'शाळा घेताना' दिसणार आहे.

शिव ठाकरे घरातील पहिला कॅप्टन झाल्यानंतर त्यानं वेगवेगळ्या कामांसाठी टीम्स तयार केल्या आहेत. शिवानी आणि अभिजीत एका टीममध्ये असून त्यांना घरातील साफ-सफाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवानी आणि अभिजीत गार्डन एरिआ झाडताना पुन्हा एकदा त्यांच्यात शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळणार आहे. बिचुकलेंना घरकामाची फारशी सवय नसल्याने ते विचित्र पद्धतीनं झाडू मारत होते. त्यांच्या कामाची ही पद्धत पाहून शिवानी चिडली आणि तुम्ही नीट काम केलं नाही तर मी किचन टीममध्ये जाईन अशी धमकी तिनं बिचुकलेंना दिली. बिचुकलेंनी त्यांच्या शैलीत नेहमीप्रमाणे मस्करी करण्यास सुरुवात केली. बिचुकलेंना झाडू काढताना पाहून 'असा कोण झाडू मारतं' असा प्रश्न ती विचारते. शिवानी आणि बिचुकलेंच्या या शाब्दिक चकमकीनंतर शिवानी अभिजीत बिचुकलेंना झाडू कसा काढायचा ते शिकवताना दिसणार आहे. आता बिचुकले तिचं खरंच ऐकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.