पाकिस्तान समोर आज श्रीलंकेचे आव्हान

    दिनांक :07-Jun-2019
कार्डिफ :
पहिल्या सामन्यात नामुष्कीजनक पराभव आणि दुसर्‍या सामन्यात तितकाच शानदार विजय अशी परिस्थिती  असलेले दोन संघ म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंका आज, शुक्रवारी आमने-सामने येत आहेत. इंग्लंडला पराभूत करीत विजयी मार्गावर परतलेल्या पाकिस्तान संघाचा प्रयत्न आपला हाच फॉर्म श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये कायम ठेवण्याचा असणार आहे. पाकिस्तान संघाने इंग्लंडला १४ धावांनी पराभूत केले. मात्र, पहिल्या सामन्यात त्यांना वेस्ट इंडिज संघाने सात विकेटस्ने नमविले होते.

संघाने तिन्ही विभागात चांगली कामगिरी केली व हा फॉर्म असाच कायम ठेवल्यास कोणालाही नमविण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आम्हाला कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल, असे प्रशिक्षक आर्थर म्हणाले. पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या लढतीत ८ बाद ३४८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मोहम्मद हाफिज, बाबर आझम व सर्फराज अहमद यांनी अर्धशतक झळकावले. यानंतर वहाब रियाझ, मोहम्मद आमीर व शादाब खान यांनी इंग्लंडला ९ बाद ३३४ धावांवर रोखले. पाकिस्तानने १९७५ पासून श्रीलंकेविरुद्ध विश्‍वचषक स्पर्धेत सात सामने जिंकले आहेत.दुसरीकडे फलंदाजांनी आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल, असे श्रीलंकेचे प्रशिक्षक चंदिका हथुरुसिंघा म्हणाले.