अभिनेता करण ओबेरॉयची जामिनावर सुटका

    दिनांक :07-Jun-2019
एका महिला ज्योतिषावर बलात्कार, तसेच वसूलीच्या आरोपाखाली गजाआड असलेला अभिनेता करण ओबेरॉय याला आज अखेर जामीन मिळाला. मुंबई हायकोर्टाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर करणला सोडण्याचे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून करण जामिनासाठी प्रयत्नशील होता. करण ओबेरॉयच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी दिंडोशी कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला होता. या नंतर करणच्या कुटुंबीयांनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टाचे दार ठोठावले. त्यावर आज सुनावणी झाली.
 
 
पीडित महिलेने करणवर बलात्काराच्या आरोपाबरोबरच बलात्काराचा व्हिडिओ बनवून त्या द्वारे पैसे उकळण्याचाही आकोप केला होता. आपली मागणी मान्य न केल्यास हा व्हिडिओ व्हायरल केला जाईल, अशी धमकी करणने आपल्याला दिल्याचाही या महिलेचा आरोप होता. त्यानंतर कोर्टाने करणला पोलीस कोठडी ठोठावली होती.
बलात्कार प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून अशात आरोपीला जामीन देणे योग्य होणार नाही असे म्हणणे पीडित महिला ज्योतिषाच्या वकिलाने कोर्टापुढे मांडले. तर, २५ मे या दिवशी आपल्यावर हल्ला झाल्याची पीडित महिलेने पोलिसात केलेली तक्रार चुकीची असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याचेही कोर्टाच्या निदर्शनास आले. ४ मे या दिवशी या महिलेने करणविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली होती. ५ मे या दिवशी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी करण ओबेरॉयला ताब्यात घेतले होते.
तर, १७ मे या दिवशी कोर्टाने करणला जामीन देण्यास नकार दिला. मात्र करणने आपल्या जामीन अर्जात महिलेने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे म्हटले. आपण महिलेला कधीही लग्नाचे आमिष दाखवलेले नाही. असे असताना आरोपीला अटकेत ठेवणे म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे. महिलेने दाखल केलेली हल्ल्याची तक्रार खोटी असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाल्यानंतर ही खोटी तक्रार तिने जामीन मिळू नये यासाठीच केली असल्याचे करणच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले.