'मॉन्सूनला विलंब; पेरण्या उशिरा करा, ३ दिवसांत ५ कोटी एसएमएस शेतकऱ्यांना पाठविले'

    दिनांक :07-Jun-2019
मुंबई : यंदा देशात सर्वसाधारण पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही बऱ्यापैकी पाऊस होईल, असा अंदाज आहे. मात्र, मॉन्सून उशिरा असल्यामुळे पेरण्या उशिरा करा, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. त्यासाठी गेल्या ३ दिवसांत ५ कोटी एसमएस शेतकऱ्यांना पाठविले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

खरीप आढावा बैठकीनंतर त्यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषद घेत खरीप नियोजनाविषयी सांगितले. खरीप आढावा बैठकीला सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
मॉन्सूनच्या अंदाजाबाबत हवामान विभागाने सादरीकरण केले. मध्य भारतासह महाराष्ट्रात पाऊस सर्वसाधारण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात सर्वात जास्त पिकाखालील क्षेत्र कापूस आणि सोयाबीनचे आहे. साधारणपणे ५५ ते ६० टक्के क्षेत्र कापूस, सोयाबीन पिकाखाली आहे. तर १० टक्के क्षेत्र भात लागवडीखाली आणि मका पीक क्षेत्र ११ टक्के एवढे आहे.
गेल्या वर्षी केवळ ७३ टक्के पाऊस महाराष्ट्रात पडला. विशेषतः मराठवाड्यातील काही भागात कमी म्हणजे ३८ ते ४० टक्के पाऊस पडला होता. या पार्श्वभूमीवर यंदाचे खरिप नियोजन केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तसेच गेल्या पाच वर्षात शेती क्षेत्रातील गुंतवणूक चार पटीने गुंतवणूक वाढविली, असेही ते म्हणाले.