मान्सूनला उशीर, मात्र उत्पादकता वाढली-मुख्यमंत्री

    दिनांक :07-Jun-2019
यावर्षी मान्सूनला थोडासा उशीर झाला आहे, तरीही सरासरी इतका पाऊस पडेल असे आयएमडीने म्हटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मान्सून पुढील आठवड्यात दाखल होईल असा अंदाज आयएमडीने वर्तवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच मागील वर्षी राज्यात ७३ टक्के पाऊस पडूनही उत्पादकता वाढली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मराठवाड्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला तरीही आपली उत्पादकता वाढली ही समाधानाची बाब आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

 
 
कापूस उत्पादकता १७ टक्के आणि सोयाबीनची उत्पादकता वाढली आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. २०१२-१३ या वर्षात १२८ लाख मेट्रिक टन एवढी उत्पादकता होती. तर गेल्या वर्षातली उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली आहे. शेततळी, विहिरी, जलयुक्त शिवार, प्रवाही सिंचन या सगळ्या योजनांमुळे कमी पाऊस होऊनही उत्पादकता वाढली आहे. पावसावर अवलंबून रहण्याचं प्रमाण काहीसं कमी करण्यात यश मिळालं आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. २००९ ते २०१४ या काळातल्या गुंतवणुकीची तुलना मागच्या पाच वर्षांशी केली तर ती चौपट झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.