प्रेयसीला पुन्हा मिळविण्यासाठी स्फोटकांऐवजी फटाके!

    दिनांक :07-Jun-2019
लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डात सफाईकरिता आलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकसदृश वस्तू ठेवणाऱ्या तरुणाला टिळकनगर पोलिसांनी बुलडाणा येथून अटक केली. दुसऱ्या तरुणाशी लग्न झालेल्या प्रेयसीला पुन्हा मिळविण्यासाठी त्याने एक्स्प्रेसमध्ये स्फोटकांऐवजी फटाके ठेवून चिठ्ठीमध्ये तिच्या पतीचा मोबाइल क्रमांक लिहून ठेवल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
 
 
शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस बुधवारी पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये दाखल झाल्यानंतर आसनांखाली वर्तमानपत्रात गुंडाळलेली संशयास्पद वस्तू दिसून आली. रेल्वे पोलिस, बॉम्बशोधक व नाशकपथकाने तपासणी केली, त्यावेळी दिवाळीचे फटाके, वायर, भाजपविरोधात मजकूर असलेले निनावी पत्र आणि बंद पडलेली बॅटरी अशा वस्तू सापडल्या. निनावी पत्रामध्ये एक मोबाइल क्रमांक लिहून ठेवला होता. हा क्रमांक असलेल्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये आपल्याला काही दिवसांपासून अनोळखी क्रमांकावरून फोन येत असल्याचे या तरुणाने सांगितले. या सर्व क्रमांकांची शहानिशा केली, त्यावेळी ते बुलडाणा येथील असल्याचे पुढे आले. ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या पत्नीचे या ठिकाणी माहेर असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी बुलडाणा येथे जाऊन चौकशी केली, त्यावेळी तिच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणाचा हा कारनामा असल्याचे लक्षात आले. प्रेयसीचा पती तुरुंगात गेला, तर कदाचित ती पुन्हा आपल्याला मिळेल यासाठीच त्याने हा खोडसाळपणा केला.