चिखली तालुक्यात८५ हजार हेक्टरावरील पिकांचे नियोजन : सोयाबीनला प्राधान्य

    दिनांक :07-Jun-2019
चिखली : शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून शेतीच्या मशागतीची कामे सुरू करून खते व बियाण्यांसाठी जुळवाजुळव केली जात आहे. कृषी खात्यानेही आढावा बैठक घेऊन खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. जास्तीत जास्त क्षेत्र कोरडवाहू असल्याने खरीप हंगामावर शेतकऱ्यांची सारी आशा असते. यावर्षी पाऊस चांगला राहील, असा अंदाज असल्याने शेतकऱ्यांच्या हंगामाबाबतच्या आशा वाढल्या असून त्याने उत्साहाने कामाला सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत आहे; त्या प्रमाणात लोकसंख्येला पुरेल एवढे तृणधान्य निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, गत काही दशकांपासून तृणधान्य पिकांखालील क्षेत्रांमध्ये कमालीची घट झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामातील ज्वारी आणि बाजरीचा समावेश असल्याने एकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेली भाकरी आता चांगलीच महागली आहे.
शेतीतून चांगला आर्थिक फायदा व्हावा या हेतूने शेतकरी खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद, तूर, मका आणि कापूस या नगदी पिकांना प्राधान्य देतात. मात्र, निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळ, अत्यल्प पर्जन्यमान आदी कारणांमुळे या नगदी पिकांनाही गेल्या काही वर्षापासून फटका बसत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा पिक बदल पध्दतीचा अवलंब केला आहे. पिक पध्दतीत फेरबदल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत कमी असली तरी ती पुढील काळात परिणाम कारक ठरणारी असल्याने हा बदल समाधानकारक असल्याचे तालुका कृषी अधिकारी अशोकराव सुरडकर यांनी सांगीतले आहे. यामध्ये प्रामुख्याने गत काही दशकांत तालुक्यातील एकूण८५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ज्वारीचे पिक यंदा ५०० हेक्टरावर घेतल्या जाणार आहे. तर बाजरीच्या क्षेत्राने ६० हेक्टरापर्यत मजल मारली आहे. पिक पध्दतीतील हा बदल चांगला आणि निश्चितपणे शेतकरी हिताचा ठरणारा आहे. दरम्यान तालुक्यातील एकूण पेरणीयोग्य ८५ हजार ८३ हेक्टरावर खरीपाची पेरणीची शक्यता आहे. गेल्या काही वर्षापासून तालुक्यातील शेतकरी सोयाबीनलाच अधिक प्राधान्य देत असल्याने यंदाही सुमारे ६२ हजार हेक्टरावर सोयाबीनची लागवडीची शक्यता आहे. यंदा २ हजार हेक्टरार्पयत मका लागवडीची शक्यता आहे.या शिवाय कापसाची ३हजार हेक्टर लागवडी ची शक्यता आहे .

 ८५हजार६३ हेक्टरावरील संभाव्य पिके
खरीपाच्या पेरणीचे सरासरी क्षेत्र ८५हजार हेक्टर आहे. यामध्ये यंदा तृण धान्यात ज्वारी ५०० हेक्टर, बाजरी ६० हेक्टर आणि मका २हजार हेक्टर, कड धान्यात तूर १२हजार हेक्टर, मूग २ हजार ५०० हेक्टर, उडीद २हजार ८०० हेक्टर ,तेल बिया क्षेत्रात ६२ हजार हेक्टरावर सोयाबीन, १०० हेक्टर भुईमूग, १०० हेक्टर तीळ , आणि ३हेक्टरवर ऊस तर ३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे
सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी पतपेढय़ा, विविध कार्यकारी संस्था आणि गरज पडली तर सावकारांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना रासायनिक खत आणि बियाणे खरेदी करावी लागणार आहे.
दरम्यान, शेतात पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून नांगरणीची कामे सुरू झाली आहेत. जमीन उघडी करून मातीचे थर खालीवर करणे हा नांगरणीचा मुख्य उद्देश आहे. यामुळे आधीच्या पिकांची धसकटे व पालापाचोळा जमिनीत गाडला जातो. पाऊस पडल्यानंतर तो कुजून त्याचे खतात रूपांतर होते. अलीकडील काळात बैलांकडून केली जाणारी नांगरणी शेतकऱ्यांनी जवळजवळ
थांबविली आहे. बैलांच्या नांगरणीला लागणारा वेळ आणि श्रम वाचावे म्हणून आता ट्रॅक्टरनेच नांगरणी होत आहे. साधारण चारशे ते पाचशे रुपये प्रतितास दराने ट्रॅक्टरने नांगरणी केली जात आहे. जमीन भुसभुशीत करण्याचे कामही आता ट्रॅक्टरने केले जात आहे. वखरणी, फणकटणी, पेरणी आणि पुढे पीक काढणी ही कामेसुद्धा शेतकरी यंत्रानेच करू लागले आहे . ढेकळे फोडणे ,जमीन सपाट करणे व वखरणी ही कामे झाल्यानंतर शेणखत टाकण्याचे काम शेतकरी सुरू करतील.