झालेला पराभव अनपेक्षित

    दिनांक :07-Jun-2019
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपचे केवळ दोन आमदार असताना आपण विक्रमी मताधिक्क्याने विजयी झालो आणि २०१९च्या निवडणुकीत देशात सर्वत्र मोदी लाट तथा या लोकसभा क्षेत्रात भाजपचे पाच आमदार असताना ४५ हजार मतांनी झालेला पराभव अनपेक्षित, चिंतनीय व धक्कादायक आहे. या पराभवाचे राष्ट्रीय पातळीवर निश्चितच चिंतन होईल. या पराभवाने खचून न जाता पक्ष कार्य अधिक जोमाने करणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभा निकालानंतर पहिल्याच पत्रपरिषदेत दिली.
 
 
 

 
भाजयुमो अध्यक्ष ते स्वीकृत नगरसेवक, विधान परिषद आमदार, खासदार त्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री आदी अनेक महत्त्वाची पदे भूषवण्याची संधी या पक्षाने दिली. भविष्यातही पक्ष वाढीसाठी अधिक उत्साहाने काम करणार आहे. पराभव झाला हे सत्य आहे. मात्र, त्यामुळे खचून न जाता अधिक सक्रियपणे काम करणार असल्याचे अहीर यांनी सांगितले. गवळी समाजातून येणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला चंद्रपूरच्या जनतेने चार वेळा लोकसभेत पाठवले. मी जनतेचा ऋणी आहे. पराभवाची अनेक कारणे आहेत. दारूबंदीमुळे पराभव झाला असता तर लगतच्या गडचिरोली व वर्धा येथून भाजपचे खासदार निवडून आलेच नसते. हा संपूर्ण पट्टाच भाजपमय झाला आहे. २०१४ मध्ये भाजपचे केवळ दोन आमदार होते. तेव्हा आपण विक्रमी मताधिक्क्याने विजयी झालो. भाजप आमदार असलेल्या चंद्रपूर, बल्लारपूर व वरोरा या तीन विधानसभा क्षेत्रात भाजपला अतिशय कमी मताधिक्य आहे, तर हा पक्षासाठी निश्चितच चिंतनाचा विषय आहे. पक्ष यावर चिंतन करेलही, असेही अहीर म्हणाले. वणी, आर्णी येथे आपल्याला मताधिक्य मिळाले तर वरोरा येथेही चांगली मते मिळाली. आपल्या विरोधात पक्षाच्या एकाही नेत्याने काम केले नाही. त्याचा पुरावा देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ भाजपने पाच वेळा जिंकला. त्यानंतरही तिथे मताधिक्य कमी झाले, हा खरा चिंतनाचा विषय आहे, असेही अहीर म्हणाले. जिल्हय़ात महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद अशी सर्वत्र सत्ता असताना भाजपसाठी हा पराभव खऱ्या अर्थाने चिंतनाचा विषय आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले याचा अपार आनंद आहे, असेही ते म्हणाले.