NEET चा टॉपर नलिन म्हणतो दोन वर्षात एकदाही वापरला नाही स्मार्ट फोन

    दिनांक :07-Jun-2019
NEET च्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या नलिनने त्याच्या यशाचे गमक अखेर सांगितले आहे. नलिन म्हणतो, मी गेल्या दोन वर्षात एकादाही स्मार्ट फोन वापरला नाही. मी दिवसातले ७ ते ८ तास अभ्यास करत असे. मागच्या दोन वर्षात एकदाही स्मार्ट फोन वापरला नाही एवढंच काय विकतही घेतला नाही असं नलिनने सांगितलं आहे. तसेच मला अभ्यास करताना जे काही अडत असे ते शिक्षकांना विचारण्यात मला संकोच वाटत नसे. अभ्यास करण्याची चिकाटी आणि चांगले गुण मिळवण्याचे ध्येय यामुळे मी एवढं यश मिळवू शकलो असं नलिनने म्हटले आहे. मी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करू शकलो ते मला मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच असंही नलिनने स्पष्ट केलं आहे

बुधवारी NEET परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. या परीक्षेत नलिन खंडेलवालने देशात पहिला येण्याचा मान पटकावला. नलिनने ७२० पैकी ७०१ गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला. तर दिल्लीचा भविक बंसल हा देशात दुसरा आहे आहे. उत्तर प्रदेशातील अक्षत कौशिकने तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या सार्थक भटने ७२० पैकी ६९५ गुण मिळवत देशात सहावा क्रमांक पटकावला. NEET -2019 या परिक्षेसाठी १५,१९,३७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७,९७,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ५ मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. परंतु फॅनी वादळाच्या तडाख्यामुळे कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी २० मे रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या परीक्षेत नलिन खंडेलवाल या विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. मागील दोन वर्षात स्मार्ट फोनला आपण हात तर लावलाच नाही शिवाय विकतही घेतला नाही असे सांगत अभ्यासावर लक्ष कसे केंद्रीत केले हे आता नलिनने स्पष्ट केले आहे. सध्या स्मार्ट फोन शिवाय तरूण पिढीचं पान हलत नाही. अशात NEET परीक्षेत टॉप केलेल्या मुलाने स्मार्ट फोनला हातही लावला नसल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण एक आदर्श आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.