‘त्या’ महिला रिक्षाचालकास आर्थिक मदत -विजय गोयल यांचा पुढाकार

    दिनांक :07-Jun-2019
नवी दिल्ली: माजी केंद्रीय राज्यमंत्री विजय गोयल यांनी दिल्लीतील पहिल्या महिला रिक्षाचालक सुनीता चौधरी यांना 30 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. दोन दिवसांपूर्वी सुनीता चौधरी यांची तीस हजार रुपयांची रक्कम पळविण्यात आली होती.
आपल्या टि्‌वटमध्ये गोयल म्हणतात, आज सकाळी दिल्लीमधील पहिल्या महिला रिक्षाचालक सुनीता चौधरी यांची 30 हजार रुपयांची कमाई लुटली गेल्याची बातमी वाचून मन सुन्न झाले. माझ्या खासदारकीच्या पगारामधून त्यांना 30 हजारांची मदत करीत आहे. प्रत्येक महिन्याला गरजू लोकांना पगारातून मदत करणार आहे. कोणालाही मदत केल्यानंतर आत्मसमाधान लाभते, असे गोयल यांनी नमूद केले आहे.
 
 
 
मंगळवारी 40 वर्षीय सुनीता चौधरी यांना सहकारी रिक्षाचालकानेच लुटले होते. तिच्याकडील 30 हजार रुपये घेऊन तो पसार झाला. चौधरी यांनी साहिबाबाद पोलीस ठाण्यात याबाबत तत्काळ तक्रार दाखल केली.
सुनीता चौधरी या मूळ मेरठच्या असून, त्या मागील 15 वर्षांपासून दिल्लीत वास्तव्यास आहेत. मंगळवारी त्या मेरठहून दिल्लीला पोहचताच, रिक्षामध्ये बसल्या. जवळ दोन बॅग होत्या. त्या रिक्षामध्ये मागे ठेवण्यात आल्या. रिक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच चालकासोबत एक आणि मागे दोन प्रवासी बसले. मोहननगर उड्‌डाण पुलावर पोलिसांमुळे समोर बसलेल्या तरुणाला चालकाने मागे बसवले. पुढच्या वाहतूक सिग्नलजवळ रिक्षा बंद पडल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्या दुसरा रिक्षा घेण्यासाठी खाली उतरल्या. त्याचवेळी चालकाने रिक्षा सुरू केली आणि पसार झाला. त्यांच्याकडील बॅगमध्ये 30 हजार रुपये होते. सुुनीता यांनी बसमध्ये बसून रिक्षाचा पाठलाग केला. मात्र, रिक्षाचालक पसार झाला होता.