कॉंगे्रसमधील वणवा विझवा

    दिनांक :07-Jun-2019
- मोईली यांचे राहुल गांधींना आवाहन
हैदराबाद,
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देशभरातच कॉंगे्रसमध्ये वणवा पेटला आहे. प्रत्येक राज्यात नेते पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत आहेत, मतभेद उफाळून येत आहेत. पक्षाचे अध्यक्ष या नात्याने हा वणवा विझविण्याची जबाबदारी तुमचीच आहे, तेव्हा तुम्ही शांत न बसता, लगेच हालचाली करा, असे आवाहन कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी आज शुक्रवारी राहुल गांधी यांना केले आहे.
 

 
 
पक्षातील सध्याच्या स्थितीवर आम्ही सर्वच जण चिंतीत आहोत. विशेषत: पंजाब आणि राजस्थानमध्ये स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्रात तर पक्षाचे अस्तित्वच पणाला लागले आहे. जेव्हा नेतृत्व काहीच करीत नसते, तेव्हा अशी स्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे, याकडे मोईली यांनी राहुल गांधींचे लक्ष वेधले.
 
कॉंगे्रसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे, पण राजीनाम्याची ही योग्य वेळ नाही. जोपर्यंत तुम्ही ठोस पर्याय निवडत नाहीत, तोपर्यंत पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुम्हालाच काम करावे लागणार आहे. पक्षाला असे वार्‍यावर सोडता येणार नाही, असा सल्लाही मोईली यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिला.
 
तुम्ही राजीनाम्याचा विचार डोक्यातून काढा, सक्रीय व्हा, जबाबदारी स्वीकारा आणि पक्षात शिस्त लावा, तसेच जराही वेळ वाया न घालवता पक्षात आवश्यक ते फेरबदल करा, जेणेकरून पक्ष कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास निर्माण होईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळे पक्षाने विशेषत: नेतृत्वाने असे खचून जायला नको. भविष्यात पक्षाला नक्कीच चांगले दिवस येतील, यावर माझा विश्वास आहे. कॉंग्रेसमधील प्रत्येक नेत्याने व कार्यकर्त्याने याबाबत आशावादी राहायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
 
पक्षाचे आमदार आणि अन्य वरिष्ठ नेत्यांमध्ये विरोधकांच्या तंबूत जाण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे. ही स्थिती चांगली नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी केंद्रीय नेतृत्व म्हणून तुम्ही तातडीने पुढाकार घेण्याची गरज आहे. आपल्या पराभवासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात, पण त्यामुळे खचून न जाता, पक्ष संघटित कसा राहील, यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी राहुल गांधी यांनी शक्य तितक्या लवकर बैठक बोलवावी, ज्यात केवळ कार्यसमितीचे सदस्य आणि प्रदेशाध्यक्षच नाही, तर पक्षाच्या पाठीशी आजवर खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आणि आज दुर्लक्षित झालेल्या नेत्यांनाही बोलावण्यात यावे. या बैठकीनंतर राज्य स्तरावरही अशा अनेक बैठका घ्यायला हव्यात, असा उपदेशही मोईली यांनी दिला आहे.