रेल्वेने वाचविले १४ कोटी लिटर पाणी

    दिनांक :07-Jun-2019
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाने मागील वर्षात दूषित पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून तब्बल १४ कोटी लिटर पाण्याची बचत केली आहे. एवढेच नव्हे तर ७५ हजार झाडे लावून वृक्षसंवर्धनाला गती देण्याचे कामही रेल्वे विभागाने सुरू केल्याची माहिती अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही़ के. नागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भारतीय रेल हा भारत सरकारचा महत्त्वपूर्ण विभाग आहे़ या विभागातील सोलापूर विभागाने सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात ५ लाख लिटर, दौंड रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर व वाडी रेल्वे स्टेशनवर ३़५ लाख लिटर क्षमतेचा पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट उभा केला आहे़ या प्रोजेक्टच्या माध्यमातून रेल्वेतील वापरण्यात आलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून हे पाणी पुन्हा वापरात आणण्याचे काम सोलापूर विभागाने मागील काही वर्षांपासून सुरू केले आहे़ त्यामुळे आतापर्यंत १४ कोटी लिटर पाण्याची बचत या माध्यमातून झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.
 
 
 
 सौरऊर्जेद्वारे १६ हजार युनिट विजेची निर्मिती
- आजच्या जीवनामध्ये ऊर्जेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऊर्जा वापराच्या प्रमाणावर उत्पादन, क्षेत्रीय विकास व पर्यायाने जीवनमान अवलंबून आहे. ऊर्जेच्या पारंपरिक आणि अपारंपरिक साधनांचा काळजीपूर्वक वापर केल्यास आजच्या ऊर्जा संकटावर थोडी मात केली जाऊ शकते. हाच धागा पकडून सोलापूर रेल्वे विभागाने सोलापूर विभागात ४ हजार ४०० एलईडी बल्ब लावले आहेत़ ज्यातून वर्षाला १३ लाख ८ हजार ७८० युनिटची बचत रेल्वेची होत आहे़ शिवाय भैय्या चौकात असलेल्या रेल्वे हॉस्पिटलवर १० किलो मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभा केला आहे. त्यामुळे वर्षाकाठी १६ हजार युनिटचे उत्पादन होत आहे़ ज्यामुळे १ लाख ४४ हजार रुपयांची बचत होत असल्याचेही व्ही. के. नागर यांनी सांगितले.